भारतामध्ये क्रिकेट, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्राबद्दल सर्वाधिक चर्चा होते असं म्हटलं जातं. त्यातही या दोन क्षेत्रातील व्यक्ती एकत्र आल्या की कायम त्यांची चर्चा रंगताना पाहायला मिळतं. यामध्येच सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. या दोघांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे उत्तम फॅशनसेन्स आणि सौंदर्यामुळे चर्चेत येणारी ही अभिनेत्री अनेक वेळा पती विराट कोहलीचे कपडे वापर असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

काही दिवसापूर्वीच अनुष्काने वोग मासिकासाठी हॉट फोटोशूट केलं. याच दरम्यान झालेल्या एका मुलाखतीमध्ये अनुष्काने विराटविषयी आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी बोलत असताना तिने, ‘मी अनेक वेळा विराटचे कपडे वापरते’ असं सांगितलं.

“मी बऱ्याच वेळा विराटचे कपडे वापरते. खासकरुन त्याचे टी-शर्ट आणि जॅकेट्स मी वापरते. मुळात माझी ही सवय त्यालादेखील आवडते”, असं अनुष्काने सांगितलं. दरम्यान, अनुष्काने या गोष्टींचा जरी आता खुलासा केला असला तरीदेखील अनेक वेळा तिला विराटच्या कपड्यांमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. विराट आणि अनुष्का यांनी डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर अनुष्का फार कमी चित्रपटांमध्ये झळकली. अभिनेता शाहरुख खानसोबत तिने झीरो हा चित्रपट केला होता. त्यानंतर ती फारशी चित्रपटांमध्ये दिसली नाही. परंतु आता ती लवकरच एका रोमॅण्टीक चित्रपटामध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.