बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर मस्तीखोर स्वभावामुळेही ओळखली जाते. बऱ्याच वेळा तिचा हा मस्तीखोर अंदाज चित्रपटांमध्येही पाहायला मिळतो. तिच्या मस्तीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका पाळीव श्वानाला मुद्दाम गाणं म्हणून त्रास देत आहे. विशेष म्हणजे तिचं गाणं ऐकून या श्वानाने जे केलं ते पाहून अनेकांना हसू अनावर झालं.

मस्तीखोर अंदाजासाठी ओळखली जाणारी अनुष्का एका श्वानासमोरही मस्ती करत असून मुद्दाम त्याला त्रास देत आहे. तिच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातं एक गाणं ती या श्वानासमोर जोरजोरात म्हणत आहे. विशेष म्हणजे ती मस्ती करत असल्याचं या श्वानाच्याही लक्षात आलं आणि तोदेखील तितक्याच प्रेमाने तिच्याजवळ गेला.


दरम्यान, अनुष्काला प्राण्यांची विशेष आवड असल्याचं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी ती पती विराट कोहलीसोबत भूतानला गेली होती. त्यावेळीदेखील तेथील एका श्वानासोबत फोटो काढून तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. इतकंच नाही वरळीमध्ये एका भटक्या कुत्र्याला अमानुषपणे वागणूक मिळाल्याचं समजताच त्यावरही तिने संताप व्यक्त केला होता.