आयुषमान खुराना सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २०१९ हे त्याच्या सिनेकारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले आहे. त्याने या वर्षात सलग तीन सुपरहिट चित्रपटांच्या जोरावर तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई केली. या अचंबित करणाऱ्या कमाईमुळे आयुषमानला बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या पंक्तित स्थान मिळाले आहे.
आयुषमानने २०१९मध्ये ‘आर्टिकल १५’, ‘ड्रिम गर्ल’ आणि ‘बाला’ या तीन चित्रपटांमध्ये काम केले. आश्चर्याची बाब म्हणजे हे तीनही चित्रपट वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरले आहेत. या तीन चित्रपटांच्या जोरावर आयुषमानने जगभरातून तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे आता आयुषमानला बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार म्हटले जात आहे.
या झंझावाती वर्षाबद्दल काय म्हणाला आयुषमान?
“हे वर्ष माझ्यासाठी कमालीचे ठरले. कुठलाही नवा चित्रपट स्विकारताना मी नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रयोग प्रेक्षकांना आवडत आहेत. त्यामुळे ते माझ्या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद देत आहेत.” अशा शब्दात आयुषमान खुरानाने प्रेक्षकांचे आभार मानले.