समतोल नसेल तर कुठलेही समीकरण यशस्वी ठरत नाही, गणितातला हा नियम नात्यांनाही लागू पडतो. ‘बार बार देखो’चा हुश्शार नायक हे तत्त्वज्ञान ऐकवतो. किंवा हे त्याला समजेपर्यंत चित्रपट घडत राहतो. पण समतोलाचा हा नियम सांभाळणे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या नित्या मेहरालाही जमलेले नाही. त्यामुळे फँटसीच्या वेष्टणातून वास्तवाची मांडणी करताना दोन्हीचा समतोल कथेतच नसल्याने चांगल्या कल्पनेवरचा चित्रपट मनात शिरतो, पण काळजाला भिडण्यापर्यंतची वाट तो हरवून बसतो. गेल्या एक-दोन वर्षांत शहरी कथांची मांडणी करणाऱ्या तरुण दिग्दर्शकांची जी फळी आली त्या विनिल मॅथ्यूचा ‘हंसी तो फसी’, शकुन बात्राचा ‘कपूर अँड सन्स’सारख्या चित्रपटांच्या धर्तीवरचा नित्या मेहराचा हा चित्रपट वेगळा ठरतो हेही मान्य करायला हवे.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या फ्रेमपासूनच एका गाण्यातून लहानग्या जय आणि दियाची कथा आपल्यासमोर उलगडते. जय आणि दियाची चांगली मैत्री आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवून बसलेल्या हुश्शार पण बुजऱ्या जयला हसरी, खेळकर, अवखळ दिया मैत्रीच्या पलीकडे नेत सांभाळते, त्याला मोठा करते. एकमेकांबरोबर मोठे झालेले दिया (कतरिना कैफ) आणि जय (सिद्धार्थ मल्होत्रा) एका अर्थाने एकमेकांत सामावून गेले आहेत. तरीही दियाचा विवाहाचा निर्णय गणिताचा प्राध्यापक म्हणून केंब्रिज विद्यापीठात जाऊन संशोधन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जयला पचनी पडत नाही. तिथून त्यांच्या तणावाला सुरुवात होते. विवाह बंधनाची रीत समजावून घेताना त्यामागे तर्क शोधणारा आणि ते सापडत नाही म्हणून आपल्याच गोंधळात अडकत चाललेला जय एका क्षणाला दियाला सत्य सांगून मोकळा होतो. कथेच्या सुरुवातीपासूनच या दोघांच्या नात्यातला हा तुटता बंध दिग्दर्शक म्हणून नित्याने सुंदररीत्या पकडला आहे. बुजऱ्या जयसाठी वयाच्या आठव्या वर्षांपासून त्याचे प्रत्येक निर्णय घेणाऱ्या दियाला लग्नाच्या दिवशी तिचं हे जयसाठी निर्णय घेणं त्याला आवडतच नाही हे कळल्यावर धक्का बसतो. दिया आणि जयच्या नात्याचा दोर ताणला जातो, मात्र तो तुटायच्या आतच दिग्दर्शिका जयला ‘टाइम मशीन’मध्ये बसवते. ‘टाइम मशीन’चा उल्लेख केल्यानंतर साहजिकच ‘बॅक टू द फ्यूचर’ स्टाइल हॉलीवूडपटांची आठवण येते. मात्र इथे आपला देशी नायक कुठल्याच टाइम मशीनमध्ये बसताना दिसत नाही. पण दरवेळी तो झोपून उठतो तेव्हा त्याने वयाचा एकेक टप्पा पार केलेला असतो. या वयाच्या टप्प्यांमधून तो पती, वडील अशा वेगवेगळ्या भूमिका जगतो. नेहमी भविष्याकडे पाहत पळणाऱ्या जयला त्याच पद्धतीने हिशोबी जीवन जगले तर कु ठल्या प्रकारचे आयुष्य अनुभवायला मिळेल ते याचि डोळा पाहण्याची संधी मिळते.
वर्तमानातून भविष्याकडे पुन्हा मधल्याच भूतकाळात अडकून पडत सुधारण्याची संधी शोधणाऱ्या जयच्या माध्यमातून सध्याच्या पिढीच्या जीवनशैलीबद्दल, नातेसंबंधांकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल दिग्दर्शिकेने भाष्य केले आहे. मात्र जयच्या या फँटसीला धड कुठलेही तर्कट दिलेले नसल्याने त्याची फँटसीही कळत नाही आणि वास्तवही भिडत नाही. दियाची जी व्यक्तिरेखा लहानपणापासून कणखर दाखवली आहे तीही जयच्या या प्रवासात हरवून जाते. त्यामुळे एका क्षणानंतर तो फक्त जयचा चित्रपट उरतो आणि त्या अर्थाने हा पूर्ण चित्रपट सिद्धार्थ मल्होत्राच्या खांद्यावर आहे. तरुण जय ते आपल्या आईच्या मृत्यूमुळे, दियाच्या जाण्याने एकाकी पडलेला ६४ वर्षांचा म्हातारा जय असा मोठा कॅनव्हास त्याला मिळाला आहे. मेकअपच्या मदतीने जयच्या वयाचे टप्पे पार पडले असले तरी कथेतल्या गोंधळापुढे सिद्धार्थचे प्रयत्न फोल ठरतात. कारण कथेप्रमाणे ६४ वर्षांच्या शरीरातला जय मनाने मात्र अजूनही तरुण आहे. त्यामुळे पडद्यावर वावरताना साहजिकच सिद्धार्थच्या देहबोलीत वयानुरूप होणारे बदल दिसत नाहीत. यामुळे चित्रपटाचा प्रभाव खूप मर्यादित झाला आहे. रजित कपूरने साकारलेले गुरुजी आणि जयचे नातेही चित्रपटात प्रस्थापित होत नाही. बाकी दियाचे वडील म्हणून राम कपूर तोंडी लावायला आहे. तर जयची आई म्हणून अभिनेत्री सारिकाचे असणेही चित्रपटासाठी महत्त्वाचे ठरले आहे. सिद्धार्थ आणि कतरिना जोडीने काही खूप चांगले क्षण या चित्रपटात दिले असले तरी त्यांची केमिस्ट्री फुलणे कथेतच नाही तर पडद्यावर कुठे दिसणार? चित्रपटाला पाच संगीतकारांचे संगीत आहे. प्रत्येक गाण्याची शैली वेगळी आहे, पण अर्थातच संगीतातील हा वेगळेपणा चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमसाठी महत्त्वाचा ठरला आहे. शहरी तरुणाईचे विषय फारसे कोणी हाताळताना दिसत नाही त्यामुळे ‘बार बार देखो’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे, पण कथेवर अधिक मेहनत घेतली असती तर तरुण दिग्दर्शकांच्या लाटेतील हाही एक यशस्वी प्रयत्न ठरला असता.
बार बार देखो
निर्माता – धर्मा प्रॉडक्शन्स, एक्सेल एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक – नित्या मेहरा
कलाकार – सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफ, सारिका, रजित कपूर, राम कपूर, सयानी गुप्ता, रोहन जोशी, ताहा शाह बदुशा.
