बॉलिवूड दिग्दर्शक शशांक खेतानचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. आलिया भट्ट आणि वरुण धवनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असल्याचे म्हटले आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ तिसऱ्या दिवशी ४३ कोटींचा गल्ला जमवेल, असा अंदाज त्यांनी ट्विटरवरुन वर्तविला आहे.
बॉक्स ऑफिसवरील चित्रपटाची कमाईचे आकडे वाढत असल्याचे सांगत त्यांनी या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी १४.७५ कोटींची कमाई केल्याचे सांगितले. पहिल्या दिवशी प्रभावानंतर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाने शनिवारी चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा २.५० कोटींची अधिक कमाई करत १४.७५ कोटींचा गल्ला जमविला. या वाढत्या आकड्यांसह भारतीय चित्रपटगृहात या चित्रपटाने दोन दिवसात २७ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये चित्रपटाची चर्चा अधिकच रंगली होती. पहिल्या दिवशीचे यश आणि बॉक्स ऑफिसवर वाढलेले कलेक्शन यामुळे सुट्टीच्या दिवसात हा चित्रपट अधिक यशस्वी ठरेल, असा विश्वास तरण आदर्श यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला.
हा चित्रपट पहिल्या दिवशी १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणार नाही, असा अंदाज चित्रपट वितरक अक्षय राठी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना वर्तविला होता. मात्र पहिल्या दिवशीच चित्रपटाने १२.२५ कोटींची कमाई करत त्यांचा अदांज फोल ठरविला होता. यावेळी त्यांनी सुट्ट्यांचा विचार करता प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसात चित्रपट जवळपास ४०-५० कोटी रुपयांची कमाई करु शकतो, असेही सांगितले होते. सोमवारी धुळवड असल्यामुळे चित्रपटाच्या कमाईतील आकड्यावर काही परिणाम होणार का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. आलिया आणि वरुणचा एक चांगला चाहता वर्ग आहे. हे दोन्ही कलाकार नेहमीच त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचतात. दोन दिवसातील कमाईवरुन ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे, असे चित्र सध्या पाहावयास मिळते.
‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ला शशांक खेतान यांनी एका वेगळ्या भूमिकेत समोर आणले आहे. पहिल्या चित्रपटात फक्त दुल्हनिया बनण्यातच रस असलेली नायिका काव्या नव्या चित्रपटात पूर्ण बदलली आहे. इथे वैदेही दुल्हनिया म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून पुढे येते. या नायिकेला प्रेम हवं आहे पण तिला तिचा योग्य तो मानही हवा आहे.