गेले काही दिवस माध्यमांपासून किंचित दूर असलेला अभिनेता राजकुमार राव त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भीड’ या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्धीमाध्यमांसमोर आलेल्या राजकुमारवर गेले काही दिवस त्याने प्लॅस्टिक सर्जरी केली असल्याचे सांगत समाजमाध्यमांवरून टीका सुरू आहे. ‘भीड’च्या निमित्ताने मुलाखत देत असताना त्याला या प्लॅस्टिक सर्जरीबद्दल पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्याने या सगळय़ाच टीकेचा हसत हसत समाचार घेतला. त्याच वेळी कारकीर्दीच्या सुरुवातीला आलेल्या विचित्र अनुभवांविषयीही सांगितले. कलाकाराचा चेहरा, त्याची शरीरयष्टी या सगळय़ा गोष्टी तपासण्यात अनेकदा त्याच्यातील अभिनय कौशल्याचा विचारच केला जात नाही, याकडे त्याने लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकुमार रावच्या चेहऱ्यावर कायमच एक मंदस्मित झळकत असतं, मात्र सध्या ते अधिकच देखणं झालं आहे आणि या देखण्या हास्यकौशल्यासाठी त्याने प्लॅस्टिक सर्जरीच केली आहे, असा छातीठोकपणे दावा सध्या समाजमाध्यमांवरून सुरू आहे. त्यामुळे या गोष्टीत तथ्य आहे का? असा थेट प्रश्न त्याला करण्यात आला. तेव्हा त्याने ‘नही भैय्या.. कोई प्लॅस्टिक सर्जरी नही हुई..’ असं हसत हसतच उत्तर दिलं. मग सध्या तुझ्या या देखण्या हास्यावरून जे काही दावे-टीका सुरू आहे त्याकडे तू कसं पाहतोस? याही प्रश्नाला त्याने मी फक्त हसतो.. असं खास त्याच्या शैलीत उत्तर दिलं. ‘लोक माझ्याविषयी बोलत आहेत, खूप छान. ते ऐकल्यावर माझ्या चेहऱ्यावर आपोआपच हसू येतं,’ अशा शब्दांत त्याने चाहत्यांची निदान याबाबतीतली टीका आपण फारशी मनावर घेत नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र चित्रपट कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात याच त्याच्या दिसण्यावरून, चेहऱ्यावरून मिळालेल्या नकाराचे अनुभवही त्याने स्पष्टपणे सांगितलेले आहेत.

मध्यंतरी एका मुलाखतीत त्याने अभिनेता म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरून आणि शरीरयष्टीवरून किती तरी गोष्टी ऐकवल्या गेल्याचं सांगितलं होतं. ‘मला खूप काही गोष्टी ऐकवल्या गेल्या आहेत. तुझी उंची पुरेशी नाही, तुझा बांधा योग्य नाही, तुझ्या भुवया योग्य आकारात नाहीत.. अशा किती तरी विचित्र गोष्टी मला सांगितल्या गेल्या; पण माझा त्यांना प्रश्न असायचा, हे सगळं ठीक आहे.. माझ्या अभिनयाचं काय? अभिनय ही एकच अशी गोष्ट आहे जी मला पुढे घेऊन जाणार आहे. बाकी काही उपयोगाचं नाही, हीच माझी धारणा होती आणि तेच सत्य आहे. शेवटी तुमच्यातली हुशारी तेवढी टिकते, इतर काही उपयोगी ठरत नाही, असं उत्तर त्याने दिलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bheed actor rajkummar rao reacts to plastic surgery zws