‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोमध्ये सर्वांत चर्चेत राहिलेला स्पर्धक असिम रियाजवर बुधवारी अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात असिमला बरीच दुखापत झाली आहे. घराबाहेर सायकल चालवण्यासाठी निघालेल्या असिमवर हा हल्ला झाला. असिमचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये असिम सांगताना दिसत आहे की, जेव्हा बुधवारी रात्री १० वाजता तो सायकल चालवण्यासाठी निघाला, तेव्हा बाईकवरील अज्ञात लोकांनी त्याच्यावर मागून हल्ला केला. असिमच्या पायाला, हाताला व पाठीवर दुखापत झाली आहे. हल्ला करणाऱ्यांना तो ओळखत नसल्याचं असिमने सांगितलं. या घटनेची तक्रार त्याने पोलिसांकडे दाखल केली की नाही याबाबत त्याने काहीच सांगितलं नाही. असिमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते त्यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. ट्विटरवर #GetWellSoonAsim असा हॅशटॅगसुद्धा ट्रेण्ड होत आहे.
असिम हा मॉडेल असून तो काश्मिरी आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर तो सर्वाधिक चर्चेत आला. या रिअॅलिटी शोनंतर असिम मुंबईतच राहू लागला. सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत.
