अभिनेता वरुण धवन पुढील वर्षातील एप्रिल महिन्यासाठी बराच उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. वरुणची ही उत्सुकता नेमकी कशासाठी आहे, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. काहींनी तर त्याच्या लग्नाचे आणि साखरपुड्याचे तर्क लावण्यासदेखील सुरुवात केली आहे. पण, तसे काहीही नसून, त्याची ही उत्सुकता आगामी चित्रपटाविषयीची आहे. कोणत्याही कलाकाराला त्यांच्या आगामी चित्रपटाची, प्रोजेक्टची नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. अभिनेता वरुण धवनही अशाच कलाकारांपैकी एक.

वरुण सध्या त्याच्या आगामी ‘ऑक्टोबर’ या चित्रपटाबद्दल फारच उत्सुक असून, त्याने सोशल मीडियावरुन ही उत्सुकता व्यक्तही केली आहे. त्या चित्रपटासाठी उत्सुक असलेल्या वरुणने एक फोटो पोस्ट करत अनोख्या अंदाजात चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. १३ एप्रिल २०१८ ला वरुणचा ‘ऑक्टोबर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुजीत सरकार दिग्दर्शित या चित्रपटातून ‘यूके’ची बनिता संधू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. १८ वर्षीय बनिता लंडनस्थित भारतीय वंशाची ‘पंजाबी कुडी’ आहे. वयाच्या ११ व्या वर्षापासून ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. गेल्या वर्षी ‘डबलमिंट’च्या एका जाहिरातीतही ती झळकली होती.

बनिताच्या त्या जाहिरातीचे दिग्दर्शन सुजीतने केले होते. जाहिरातीला मिळालेली लोकप्रियता पाहता सुजीतने बनिताला आपल्या आगामी चित्रपटासाठी निवडण्याचा निर्णय घेतला होता. ‘ऑक्टोबर’च्या स्क्रिप्टवर काम करत असतानाच सुजीतने बनिताची निवड केली होती. तेव्हा आता त्याची ही निवड प्रेक्षकांना भावणार का, वरुण धवनसोबत रुपेरी पडद्यावरील तिच्या समीकरणाला प्रेक्षक दाद देणार का, हे पाहणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा