गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री हुमा कुरेशीने तिच्या आरोग्याकडे लक्ष देण्यावर भर दिला आहे. सध्या हुमा २८ दिवसांच्या डाएटवर असून, त्यासंबंधीचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहता प्रथमदर्शनी तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. कारण, हुमाचा डाएट प्लॅन आहेच तसा. या २८ दिवसांच्या डाएट प्लॅनमधील दहा दिवस पूर्ण झाले असून हुमा प्रत्येक दिवसाचे काही फोटो न विसरता शेअर करत आहे.
या डाएट प्लॅनच्या सुरुवातीलाच हुमाने काही सोप्या गोष्टी सर्वांसोबत शेअर केल्या. सॅलेड्स, ताज्या फळांचे रस, सुकामेवा, फळं आणि काही स्नॅक्स असा भलाभक्कम डाएट प्लॅन सध्या हुमा फॉलो करतेय. त्यामुळे वाढत्या वजनावर ताबा ठेवण्यासाठी आणि शारीरिक सुदृढतेसाठी हुमाने घेतलेल्या या निर्णयात तिला यश मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चाकोरीबद्ध भूमिकांपेक्षा काही वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत हुमाने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पाच वर्षांच्या कारकिर्दीत हुमाने विविध कलाकारांसोबत चित्रपटातून काम केले आहे. हुमा कुरेशीने २०१२ मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘लव्ह शव ते चिकन खुराना’, ‘डी-डे’, ‘डेढ इश्किया’, ‘एक थी डायन’, ‘बदलापुर’ आणि ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटातून ती झळकली होती. बॉलिवूडमध्ये नावारुपास आलेली ही अभिनेत्री सध्या तिच्या हॉलिवूड पदार्पणासाठीही सज्ज झाली आहे. दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढा यांच्या ‘द वॉयसराय हाउस’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.