दिवस-रात्र आपल्या मुलांसाठी, घरासाठी सतत राबते ती आई. एकही दिवस सुट्टी न घेतला अविरत परिश्रम करते ती आई. कितीही थकली तरी चेहऱ्यावर त्याचा त्रास न जाणवू देता कायम स्मित हास्य करते ती आई. मग आपल्यासाठी इतके कष्ट करणाऱ्या आईचा सन्मान नको का करायला? तर अर्थात केलाच पाहिजे. आई एवढी मेहनत आणि कष्ट सहन करण्याची ताकद आपल्यात नसेल पण निदान तिच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोललो तरी तिच्यासाठी ते फार आनंद देणारे असतात. मात्र हे सारं जरी आपण केलं. तरीदेखील तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मदर्स डे. मे महिन्यतील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे आईची महती शब्दांत सांगता येण्यासारखी नाही, मात्र तरीदेखील काही चित्रपटांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून आईचं सुंदररित्या वर्णन केलं आहे. चला तर पाहुयात खास आईवर चित्रीत करण्यात आलेली ही गाणी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. तू कितनी अच्छी है –

‘राजा और रंक’ या चित्रपटातील हे गाणं आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल या दिग्गज जोडीने या गाण्याला संगीत दिलं असून गानकोकिळा अर्थात लता मंगेशकर यांनी हे सुमधूर आवाजात गायलं आहे.

२. मेरी माँ-

काही नाती ही कधीही न बदलणारी असतात, त्यातचं एक नातं म्हणजे आई आणि मुलांचं. काळानुसार चित्रपटांच्या कथानकांमध्ये बदल होत गेले, मात्र आईचं पात्र कधीच कोणाला बदलता आलं नाही. ‘यारियाँ’ या चित्रपटातील मेरी मां हे गाणंदेखील त्यातलंच एक उदाहरण आहे. प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं के.के. यांनी गायलं आहे.

३. मम्मा –

‘दसविदानिया’ या चित्रपटातील ‘मम्मा’ हे गाणं ऐकल्यावर आजही अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं असून संगीतही त्यांनीच दिलं आहे.

४. चूनर-
‘एबीसीडी 2’ या चित्रपटातील हे गाणं आहे. याला सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर लोकप्रिय गायक अरजीत सिंहने ते गायलं आहे.

५. लुका छुपी-

‘रंग दे बसंती’ या चित्रपटातील हे गाणं काळजाचा ठाव घेणारं आहे. देशाप्रती कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या एका जवानाच्या आईच्या मनाची व्यथा, तिची घालमेल या गाण्यातून मांडण्यात आली आहे. ए. आर. रहेमान यांचं संगीत असलेल्या या गाण्याला लता मंगेशकर आणि ए.आर.रहेमान यांनी आवाज दिला आहे.

६. ऐसा क्यों माँ –

अभिनेत्री सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘नीरजा’ चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला विशाल खुराना यांनी संगीत दिलं असून सुनिधी चौहानने हे गाणं गायलं आहे.

दरम्यान, या गाण्यांप्रमाणेच अशी अनेक गाणी आहेत, ज्यातून आईविषयीचं प्रेम, तिची महती सांगण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood mothers day 2020 bollywood songs to dedicate to your mom ssj