त्यात सर्वोत्तम आहे ते,
हे मैं ने क़सम ली
हे तूने क़सम ली
नहीं होंगे जुदा हम…
देव आनंदने मुमताजला सायकलवर डबल सीट घेतलयं आणि दोघेही प्रेमाच्या आणाभाका घेत एकमेकांना समजून घेत आहेत. दिग्दर्शक विजय आनंद हा गाण्याच्या चित्रीकरणात मास्टर माइंड. ‘नौ दो ग्यारह’पासून ‘रजपूत’पर्यंत त्याच्या दिग्दर्शनातील कोणत्याही चित्रपटातील कुठल्याही स्वरूपाचे गाणे पहावे ते अत्यंत प्रभावीपणे खुललेले दिसते. त्यात रोमान्सचा बादशहा देव आनंद व सौंदर्याची राणी मुमताज अशी जोडी असल्यावर गाणे अधिकच बहारदार होणार अथवा असणार हे अत्यंत स्वाभाविक आहेच. ‘तेरे मेरे सपने’ (१९७१) मधील सगळीच गाणी सुरेल म्हणूनच आजही लोकप्रिय. त्यात हे तर विशेषच गोड व देखणे.
साँस तेरी मदिर मदिर जैसे रजनी गंधा
प्यार तेरा मधुर मधुर चाँदनी की गंगा
नहीं होंगे जुदा
देव आनंद व मुमताज छान सायकलवर विराजमान होत गाताहेत. देव आनंदच्या एकूणच व्यक्तिमत्वात प्रचंड रोमान्स भरल्याने त्याच्या पाहण्यात, चालण्यात देखील प्रेम व्यक्त होई त्यामुळेच सायकलवर देखील प्रेम व्यक्त करायला त्याला वेगळे प्रयास पडले नाहीत असे जाणवते. त्यातच खुबसूरत मदनिका मुमताज डबल सीटवर असल्यावर तर त्याचे प्रेम अधिकच खुललयं. तिनेही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे त्याला प्रेमाची साथ दिलीय.
पा के कभी, खोया तुझे, खो के कभी पाया
निसर्गरम्य स्थळावरील रस्त्यावरून सायकल पुढे नेल्यावर दोघेही हिरवळीवर बसलेत, बिलगलेत आणि प्रेमाची उत्कट भावना पुढे नेतात. नीरजच्या गीताना सचिन देव बर्मनचे संगीत. सचिनदा त्या काळात नवकेतन फिल्मचे हुकमी संगीतकार. विजय आनंदला नेमके काय हवे हे जाणणारे.
एक तन है, एक मन है, एक प्राण अपने
एक रंग, एक रूप, तेरे मेरे सपने
आता मुमताज सायकलवर मागे बसलीय व पाठीमागून देव आनंदला बिलगलीय. यात रोमान्स आणि रोमांच एक झालेत. सायकलवर देखील प्रेम गीत इतके मोहक आणि आकर्षित करता आलंय की कितीही वेळा ते पाहिले तरी त्यातला टवटवीतपणा जराही कमी होत नाही. किशोर कुमार हा देव आनंदचा आवाज त्यामुळे ती एकरूपता पटकन येते. लता मंगेशकर यांचीही नायिकेप्रमाणे पार्श्वगायन करण्याची खुबी. त्यामुळेच हे गाणे सर्वच बाबतीत छान जमून आलंय.
ऐ मैने कसम ली…
गाण्याचा मुखडाच पटकन सायकल, देव आनंद व मुमताज या तिघांमधील प्रणयाची आठवण देतो. सायकलचा इतका छान वापर क्वचितच होणारा…
दिलीप ठाकूर