टेलिव्हिजन कलाकारांनी चित्रपटसृष्टीकडे वळणं हा काही नवा ट्रेंड नाही. गेल्या बऱ्याच वर्षांपासून विविध टिव्ही कलाकारांनी त्यांच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मौनी रॉयसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मौनीला सलमान खान त्याच्या चित्रपटातून लाँच करणार अशा चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून म्हटलं जात होतं. पण, आता ती दुसऱ्याच अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करत बी- टाऊनमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सलमानच्या बहिणीचा म्हणजेच अर्पिता खानचा पती आयुश शर्मा याच्यासोबत मौनी स्क्रीन शेअर करणार आहे. ‘रात बाकी’ या चित्रपटातून हे दोन्ही कलाकार आपल्याला दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या बाबतीत अद्यापही कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. पण, मौनी आणि आयुष यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळणार का, हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करत आहे.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

सध्याच्या घडीला चित्रपटांच्या निवडीबद्दल प्रेक्षकही बरेच सजग असल्यामुळे या जोडीचं भवितव्य त्यांच्याच हातात असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, मौनी आणखी एका बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खिलाडी कुमारच्या आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटातून ती झळकणार आहे. या चित्रपटातील कथनकाच्या दृष्टीने तिची भूमिकाही फार महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अभिनय आणि नृत्यक्षेत्रात आपली छाप सोडणारी मौनी चित्रपटातून प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात यशस्वी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.