बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदवीर जगदीप म्हणजेच सैय्यद इश्तियाक अहमद यांचं वृद्धपकाळाने मुंबईत निधन झालं आहे. उत्तम अभिनय शैली आणि विनोदीबुद्धी यांच्या जोरावर त्यांनी कलाविश्वात एक भक्कम स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची माहिती समजताच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“जगदीप साहेब यांच्या निधनाची बातमी कानावर आली. मोठ्या पडद्यावर ते जेव्हा झळकायचे तेव्हा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला आहे. त्यांनी प्रेक्षकांचं कायम मनोरंजन केलं होतं. जावेद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जगदीप साहेबांच्या आत्म्यास शांती लाभो”, असं ट्विट अजय देवगणने केलं आहे.

‘सत्यमेव जयते’ आणि ‘मरजावां’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप जावेरीनेदेखील ट्विट करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे. ”जगदीप सरांच्या आत्म्यास शांती लाभो. तुम्ही कायम आमच्या स्मरणात रहाल”, असं मिलाप जावेरी म्हणाला आहे.

“अजून एक चमकता तारा जमिनीवरुन आकाशात गेला. जगदीप साहेब हे कलाविश्वातील उत्तम कलाकार होते. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांना काही तोड नव्हती. खूप वर्षांपूर्वी एका पार्टीत त्यांनी मला सांगितलं होतं बरखुरदार हँसना आसान है, हँसाना बहुत मुश्किल..तुमची उणीव कायम भासेल”, असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.

अजय देवगण, अनुपम खेर यांच्याव्यतिरिक्त कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगदीप यांना आदरांजली वाहिली आहे. यात आयुषमान खुराना, अनुभव सिन्हा, रणदीप हुड्डा, रितेश देशमुख,रणवीर सिंग, जॉनी लिव्हर,मनोज बाजपेयी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

दरम्यान,२९ मार्च १९३९ रोजी जन्मलेले जगदीप आपल्या विनोदी भूमिकांमुळे चांगलेच परिचयाचे बनले होते. त्यांनी ‘अंदाज अपना अपना’, ‘पुराना मंदिर’, ‘कुर्बानी’,’शहेनशहा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. २०१२ साली ‘गली गली चोर है’ या चित्रपटात त्यांनी काम होतं. परंतु त्यानंतर मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीपासून काढता पाय घेतला होता