भारतातील सर्वाधिक खपाचे, विक्रमाचे आणि चर्चेचा विषय असलेले सध्याचे लेखक म्हणजे कादंबरीकार चेतन भगत. लेखक चेतन भगतच्या कांदबरी या तरूणवर्गामध्ये विशेष लोकप्रिय असून त्याच्या अनेक कांदबरीवर आधारित चित्रपटही आले आहेत. त्याच्या ‘वन नाईट अॅट कॉल सेंटर’, ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’, ‘टु स्टेट’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कांदबरी विशेष गाजल्या. त्यामुळे चेतन भगतच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. मात्र त्यांच्या अनेक पुस्तकांच्या पायरडेट कॉपी (बनावट प्रत)बाजारात विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे एका पुस्तक विक्रेत्याने चक्क चेतनला त्याच्याच पुस्तकाची पायरडेट कॉपी विकली आहे. या घटनेचा व्हिडीओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या चेतनची गाडी एका ठिकाणी थांबली होती. गाडी थांबल्याचं पाहिल्यानंतर एका पुस्तक विक्रेत्या चेतनजवळ आला आणि त्याने चेतनच्याच एका पुस्तकाची पायरडेट कॉपी त्याला विकत घेण्याची विनंती केली. हा प्रकार पाहून चेतन काही काळ चक्रावून गेला. पण समाजातील सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकणारं एक ट्विटही त्याने केलं.

“मी लिहिलेलं पुस्तकच हा मुलगा मला विकत होता. मी पायरसीला पाठिंबा देत नाही. मात्र हे समाजातील एक कटू सत्य आहे. अशा पायरडेट कॉपी वैगरे विकूनच त्यांचा उदरनिर्वाह होतो”, असं म्हणत चेतनने ट्विट करुन ही माहिती दिली.


दरम्यान,चेतन भगत अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतो. त्यामुळे त्याला नेटीझन्सच्या अनपेक्षित प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत. मात्र यावेळी त्याने केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.