भुवनेश्वर ते पुरी ६५ किमीचे अंतर अवघ्या चौथ्या वर्षी धावून पार करणाऱ्या बुधिया सिंगची गोष्ट आपल्याला माहिती आहे. वाहिन्यांवरून त्याने केलेला विक्रम आणि त्याच्या आगेमागे उभं राहिलेलं राजकीय वादळ आपल्या ऐकिवात आहे. पण प्रत्यक्षात बुधियाचं पुढे काय झालं आणि का झालं? या प्रश्नाचं उत्तर सौमेंद्र पाधी दिग्दर्शित ‘बुधिया सिंग बॉर्न टू रन’ हा चित्रपट देतो. मुळात बुधियाची कथा एकाच व्यक्तीमुळे महत्त्वाची ठरते, ती म्हणजे त्याचा प्रशिक्षक बिरांची दास. बिरांचीचा भूतकाळ आणि त्याच्याशी बुधियाचं जोडलं जाणं समजून घेतल्याशिवाय ही घटनाच पुढे जाणार नाही. हा चित्रपट जे वास्तव आहे ते प्रखरपणे समोर आणतो, हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे.
‘बुधिया सिंग बॉर्न टू रन’ या चित्रपटाच्या निमित्ताने बोलत असताना बिरांची दासबद्दल माध्यमांमध्ये दोन प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. एक म्हणजे बुधियासारख्या सर्वसाधारण लहान मुलाला एक धावपटू म्हणून प्रशिक्षित करणारा बिरांची आणि दुसरीकडे स्वत:च्या स्वार्थासाठी चार वर्षांच्या लहान मुलाला पाणीही न देता पळवणारा निर्दयी प्रशिक्षक. यापैकी माध्यमाने त्याचं निर्दयी चित्र जास्त रंगवलं होतं’, असं बिरांचीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मनोज वाजपेयी याने सांगितलं होतं. या चित्रपटात बिरांचीची व्यक्तिरेखा मांडताना त्याच्याबद्दलची नकारी भूमिका माध्यमांमध्ये आणि जनमानसांत का होती, याचा उलगडा कथेच्या ओघातच दिग्दर्शकाने केला आहे. ओरिसामध्ये एक ज्युडो कराटेचं प्रशिक्षण देणारी संस्था चालवणारा, २२ अनाथ मुलांना जवळ करणारा, त्यांना खेळाडू म्हणून घडवणाऱ्या बिरांचीच्या हाती योगायोगाने बुधिया येऊन पडतो. बुधियाला त्याच्या आईने विकून टाकलं आहे. तिला नोकरी लावून बिरांची बुधियाला आपल्या संस्थेत आणतो. तिथेच त्याला बुधियाच्या अथक धावण्याच्या क्षमतेची जाणीव होते. आणि तिथूनच बिरांची आणि बुधिया यांची एक वेगळी कथा आकार घेते. अथक धावणं ही चार वर्षांच्या बुधियाला मिळालेली दैवी देणगी आहे हे लक्षात घेऊन त्याला त्या वयात ऑलिम्पिकसाठी तयार करण्याचं आव्हान बिरांची घेतो.
ऑलिम्पिकसाठी ज्या प्रकारे प्रशिक्षण द्यायला हवं तितक्या कठीण पद्धतीने लहानग्या बुधियाचा सराव घेणं, त्याला छोटय़ा-मोठय़ा मॅरेथॉनमधून पळवताना शर्यत पूर्ण होईपर्यंत पाणीही न देणं, बुधियाच्या लहान वयाचा विचार न करता त्याला ७० किमी धावायला लावणं या अशा अनेक गोष्टींमुळे बिरांचीबद्दल एक अस्वस्थता जनमानसांत पसरत चालली होती. बिरांचीच्या या अतिरेकी वागण्याची त्याच्या पत्नीला गीतालाही (श्रुती मराठे) चीड होती. मात्र बिरांचीच्या या वागण्यामागे एक प्रशिक्षक म्हणून अट्टहास होता की तो निर्दयी होता, याचं उत्तर दिग्दर्शकाने दिलेलं नाही. बुधिया आणि बिरांचीमध्ये एक खास नातं होतं. एक धावपटू म्हणून त्याला फक्त पळवावं एवढाच बिरांचीचा स्वार्थ होता म्हणावं तर त्याने बुधियाला चांगल्या शाळेत दाखला दिला होता. बिरांची आणि गीताने बुधियाला दत्तक घेऊन आपलंसं केलं होतं. मात्र बिरांचीचा राजकीय वावर, त्याने त्याच पद्धतीने पैसे उभे करणं या सगळ्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत, याची कल्पना नाही. पण एकूणच बिरांचीचं व्यक्तिमत्त्व सहजसाधं नव्हतं. मात्र बुधियाला २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये उभं करण्याचा त्याचा ध्यास खरा होता, हेही आपल्या लक्षात येतं. बुधिया आणि बिरांची दोघेही राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे बळी ठरले. बिरांचीची हत्या झाली आणि बुधियाच्या धावण्यावर कायमची बंदी आली. बुधियाची कथाच बिरांचीपासून सुरू होते आणि मनोज वाजपेयीसारख्या अभिनेत्याने बिरांचीच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे पैलू लक्षात घेऊन ही अप्रतिम भूमिका केली आहे. मनोजला साथ मिळाली आहे ती मयूर पाटोळे या छोटय़ाची. बुधिया प्रत्यक्षात जसा दिसतो त्याच पद्धतीने मयूर आपल्यासमोर येतो. बुधियाचं धावणं, त्याचं लहान असणं, बिरांचीवरचं त्याचं प्रेम या सगळ्या गोष्टी मयूरने लहान असूनही खूप सहज रंगवल्या असल्याने त्या दोघांच्या नात्याचा धागा प्रेक्षकांची पकड घेतो. या चित्रपटात मराठी कलाकारांची संख्या मोठी आहे हे विशेष. खूप दिवसांनी श्रुती मराठेला बिरांचीच्या पत्नीची एक चांगली भूमिका मिळाली आहे. तिनेही बिरांचीचा सगळा व्याप विनातक्रार सांभाळणारी गीता सुंदर रंगवली आहे. या चित्रपटामुळे निदान बुधियाला पुन्हा एकदा धावण्यासाठी मैदान मोकळं झालं तरी या माध्यमाने खूप काही साधलं असं म्हणता येईल.
बुधिया सिंग बॉर्न टु रन
निर्माता – व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स, कोडरेड फिल्म्स
दिग्दर्शक – सौंमेद्र पाधी
कलाकार – मनोज वाजपेयी, श्रुती मराठे, मयूर पाटोळे, छाया कदम, प्रसाद पंडित, राजन भिसे, सायली पाठक, पुष्कराज चिरपुटकर, तिलोत्तमा शोम