मिलिंद शिंदे या अभिनेत्याने मांडलेलं हृदगत, सलणाऱ्या-बोचणाऱ्या, तुम्हा-आम्हां सर्वांच्या रोजच्या आयुष्यातील विसंगतीवर नेमकेपणानं बोट ठेवत केलेलं हे विचारमंथन खास ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या वाचकांसाठी महिन्यातून दोन वेळा…
हे फार भारी चाललंय..
आमची चिऊ पाचवीला पहिली आली.
 काय सांगता..? वा! वा! ग्रेट, अतिशय उत्तम झालं हे सगळं.
 तिचे आहेतच कष्ट, पण मी आणि ह्यांनी खूप कष्ट घेतले हो..
 अगदी तिला काही काही कमी म्हणता पडू दिलं नाही
 हे तिचं निव्वळ यश आहे..
बातमी कळली का?
 कुठली..?
 देशमुखांची सायली सातवीला जिल्ह्यात पहिली आली.
 वा.. ग्रेटच.. अप्रतिम..
 कष्ट हो दुसरं काय.. फक्त कष्ट
 त्या माणसानं मेहनत केली हो फार बाकी काही नाही..
 सगळं श्रेय त्या मुलीच्या वडिलांना..
हे आपण कॅश करायला पाहिजे बरं..
 मग काय? आपल्या शाळेतली मुलगी बोर्डात दहावीला पहिली येते म्हणजे काय!
 मी तर म्हणतो मोठा फ्लेक्स करू १० बाय २०चा. साली आपल्या शाळेतली
 मुलगी दहावीला पयली आलीय..
 मटक्यानं नाही..? (सगळे खदाखदा हसतात.) (काहींच्या तोंडातला मावा दिसतो.)
 सगळय़ांनी फोटो द्या. आपण पोष्टर होर्डींग वर सगळय़ांचे फोटो लावू.
 काय..?
 सालं आपलं पन हाय ना!
 Contribution…?
 नाय.. काय..? ऑ..?
आता ह्यांचं बघा काय चाललंय..?
कॉलेजमधली जिन्स
 जिन्स १- लेक्चर नकोस वाटतात. त्यात मराटीचे तर बोरच होतात.
 जिन्स २- नाय तर काय, मऱ्हाटीमुळे काय नोकऱ्या फिकऱ्या लागत नाय न काय..
 निस्तेच डिग्री मिळते.
 जिन्स ३- पन डिग्री मिळते ना!
 जिन्स २- काय चाटायचंय असल्या डिग्रीला..?
 जिन्स १- पण सालं मुक्त उधळायला सगळे फेश्टिवल पायजे ऑ? कॉलेजमधे बाकी
 काय नाय, पन फेश्टिवल पायजेच.
 जिन्स २- मग काय, वाय शूड बायस हय़ाव आल दी फन..?
 जिन्स ३- तू व्हाट्स अप ला पायले का काय ते. कुणीतरी फोटो शेयर
 केला. कोन तरी सावित्री मॅडमचा.. कोन..? सावित्री मॅम.
 ते विद्यापिठ… काय..?
 जिन्स १- तू पन ना. चल, सोड ना.
 ज्यानी कुनी पाटवला त्याला विचार काय ते.. नायतर ब्लॉक कर त्याला..
कॉल सेंटरचे स्कर्ट्स अँड टॉप्स
दिस इज जस्ट रबीश.. यार..
 किती वेळ मी ओव्हर टाईम करायचा..?
 काय झालं..?
 ही वॉन्टस मी टू स्टे today as well
 तू बोलत का नाहीस, पण यू शूड
 रिअॅक्ट शुडन्ट यू..?
 या, आय वाँट टू.. बट..
 ओ के    ओ.. के..
 डीड यू सी.. द शेयर.. ऑन फेसबूक. रिगार्डिग मिसेस फुले.
 ऑ..?
 सावित्री मॅम फुले..?
 ओ.. हो.. तू क्या बात कर रही है.
 यहाँ मै अपने problem मे फसीं हूँ..
 और तू सोशल वर्क की बात कर रही है
एक- त्याला तर पहातेच मी आता..
 सारखं पहात असतो गं माझ्याकडे.. टक लावून.. फार अँबॅरसिंग होतं गं अशा वेळेस.
 कंटिन्युअसली गं..? सतत..अंत असतो गं सहनशीतलेचा..? बॉस असला म्हणून काय
 झालं..? मी त्याची कम्प्लेंटच करणार आहे. त्याच्याशिवाय तो जागेवर येणार
 नाही.
 दोन- तू आधीच करायला पाहिजे होतीस.
 एक- हो गं.. पण डेअरिंगच होत नाही.
 दोन- करायची. घाबरायचं नाही. आपण जर घाबरलो तर.. संपलो.. एव्हडे अधिकार,
 कायदे आहेच आपल्या बाजूने.. मग..? स्त्रीनं बोललंच पाहिजे. व्यक्त झालंच
 पाहिजे. थांब, माझी एक मैत्रीण आहे तिला सांगते.. तुझा प्रॉब्लेम.
 एक- एक मिनिट हं…बीबीएमवर एक (message) आलाय.
 क्रांतिज्योत.. काय.. पुढे.. नाव द्यायचं आहे विद्यापीठाला.. काय गं.. हे..?
 बरं ऐक ना, तो परवाच्या पार्टीचा फोटो मी टॅग केला होता तो पाहिला का..?
 काय दिसत होतो ना.. आपण दोघी.. किती वाजले गं.. रात्री घरी जायला
 आपल्याला..?
शूटिंग, शूटिंग.. साला वेळच मिळत नाही.. घरच्यांसाठी, प्रायवेट लाईफसाठी..
 जिमला जायला वेळ होत नाही.. चोवीस तास शूटिंग.. शीट..
 (फोन वाजतो.)
 हा फोन पण ना..?
 बोला..
 हां हां, त्या फिल्मबद्दल तुम्हाला मी
 काल tweet केलं होतं, पण..
 अहो हो.. मला माहीत आहे त्यांचं कार्य महान आहे.. पण मी अभिनेत्रीच मोठी
 आहे.. तुम्ही.. तुम्ही.. एक तर ऐकून घ्या. मला अभ्यासाची गरज नाही..
 सावित्रीबाईंचा
 कॉस्च्यूम चढवला की बघा..
 सोप्पं असतं हो हे..
 तुम्ही मला त्यांच्या लुक्सचे फोटो मेल करा.
 बाकी विचार वगैरे तुम्ही लिहून द्यालच.
 ते मी बोलनंच ना..?
बाई.. खाना खजानावर रेसिपी बघायला बसले.. तं लाईटच गेली. हे लोड शेडिंगचं
 काय बाई..
 आज काय होतं..?
 लेमन राइस..
 लेमन राइस.? बरं बरं, बरं
 तू ते ऐकलं का. बातम्या मधे.. इद्यापीठाला
 नाव द्यायचंय. सावित्री माय फुलेचं..
 द्यायलाच पायजे माय.. द्यायलाच पायजे.
 पण काही म्हना. माय व्हती म्हनून.
 अगं बाई, लाईट आले काय नू.. चला गं चला
 ती सीरियल लागली. आपल्या वाली..
सरसकट नाही पण बऱयापैकी असंच आहे…
ता. क.
 एका मंदिराबाहेरची फुले विकणारी बाई म्हणाली, इद्यापीठ म्हणजे काय..?
