‘शोले’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कालिया’च्या भूमिकेद्वारे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. विजू खोटे यांच्या निधनामुळे सर्व सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे खोटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच मध्य रेल्वेनंही विजू खोटे यांना आदरांजली वाहिली आहे. मध्य रेल्वेच्या एका व्हिडीओमध्ये विजू खोटे यांनी भूमिका साकारली होती. हाच व्हिडीओ पोस्ट करत मध्य रेल्वेनं खोटे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

‘मध्य रेल्वेच्या व्हिडीओमार्फत जनसामान्यांत सामाजिक संदेश पोहोचवणाऱ्या विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असं लिहित तो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओत भारतीय रेल्वे व त्याचे कर्मचारी यांचा आदर करण्याविषयीचा संदेश देण्यात आला आहे.

विजू खोटे यांनी आपल्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. त्यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे. सिनेसृष्टीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. विनोदाच्या अचूक वेळेसाठी त्यांना नेहमी ओळखले जायचे.