वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोशल नेटवर्किंगवर चर्चा होती ती भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यांची. या चर्चेसाठी कारणही तसेच खासच होते. हार्दिकने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविकला लग्नाची मागणी घातली. याची घोषणा हार्दिकनेच इन्स्टाग्रामवरुन केली. नताशानेही एका प्रायव्हेट बोटीवर समुद्राच्या मधोमध अतिशय रोमँटिकपद्धतीने हार्दिकने केलेल्या प्रपोजलचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला. नताशाच्या या व्हिडिओवर तिच्या आधीच्या प्रियकरानेही कमेंट केली आहे हे विशेष.
हार्दिक पांड्या हा क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील बातम्यांमुळे चर्चेत असतो. तो अनेकदा आपल्या मैत्रीणींसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. हार्दिकच्या आयुष्यातील तरुणींबद्दल सतत उलट सुलट चर्चा सुरु असता. कॉफी विथ करणमध्ये हार्दिकने आपल्या प्रेमप्रकरणांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर या विषयावरील चर्चांना उधाणच आले होते. मात्र पण हार्दिकने वर्षाच्या पहिल्याच दिवशी नताशासोबतचा फोटो सोशल नेटवर्किंगवरुन पोस्ट करत साखरपुड्याची घोषणा करुन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने नताशाला लग्नासाठी मागणी घालताना गुडघ्यावर बसून अंगठी देत फिल्मी स्टाइल प्रपोज केलं.
नताशानेदेखील या ‘रोमँटिक प्रपोझल’चा व्हिडीओ शेअर केला आहे. हार्दिकने गुडघ्यावर बसून नताशाला प्रपोज केल्यावर तिने होकार दिल्याचं दिसत आहे. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतलं आणि त्यानंतर हार्दिकने नताशाला अंगठी घातल्याचे या व्हिडिओत दिसते.
नताशाच्या या पोस्टवर तिचा आधीचा प्रियकर आणि टीव्ही अभिनेता अली गोनी यानेही कमेंट केली आहे. अलीने या फोटोवर हार्ट इमोन्जी पोस्ट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अली आणि नताशा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघे ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याआधीच त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यामुळेच हे दोघे ‘एक्स कपल’ म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.