‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ापासून सुरू झालेला ‘त्यांचा’ प्रवास चित्रपटसृष्टीकडे वळला आणि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये वावरलेल्या दादा कोंडके यांनी आगळा विक्रम घडविला. दादांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना मानवंदना देण्यासाठी पिपल्स आर्ट सेंटर आणि व्ॉन्स म्युझिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी मुंबईत ‘एकच सोंगाडय़ा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची संकल्पना निलेश फुटाणे आणि प्रकाश शिंदे यांची असून या सोहळ्यात दादा कोंडके यांच्याबरोबर काम केलेले आणि त्यांचा सहवास लाभलेले कलावंत आणि अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. यात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, अशोक सराफ, शक्ती कपूर, रामदास फुटाणे, उषा मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुरेश वाडकर, पुष्पा पागधरे, अनुप जलोटा, उत्तरा केळकर, उषा चव्हाण, मधु कांबीकर, राहुल सोलापूरकर, उषा नाईक, सुधीर दळवी, यशवंत भालकर, राघवेंद्र कडकोळ, विजू खोटे, जयश्री टी, अरुणा इराणी, बाळ मोहिते आदींचा सहभाग आहे.
याच कार्यक्रमात दादा कोंडके यांच्या चित्रपटांवर आधारित श्याम पेठकर लिखित एका पुस्तकाचे प्रकाशनही केले जाणार आहे. दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गाणी गायिका उर्मिला धनगर आणि व्ॉन्स म्युझिक ग्रुपचे सहकारी सादर करणार आहेत. तर उपस्थित मान्यवर कलाकार दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री व परेश दाभोळकर यांचे आहे. सायंकाळी ७.०० वाजता षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असला तरी प्रवेशिका जवळ असणे आवश्यक आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका १८ मार्च पासून षण्मुखानंद सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध असणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2014 रोजी प्रकाशित
एकच सोंगाडय़ा!
‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ापासून सुरू झालेला ‘त्यांचा’ प्रवास चित्रपटसृष्टीकडे वळला आणि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक

First published on: 13-03-2014 at 12:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada kondke