|| रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरळमार्गी माणूस एखाद्या क्षुल्लक चुकीपायी वा अनवधानाने कसा गोत्यात येऊ शकतो, त्यातून त्याची कशी व किती टोकाची परवड होऊ शकते याची कल्पना ज्याने असा अनुभव घेतला असेल त्यालाच येऊ शकते. कधी कधी नकळत घडलेल्या अशा साध्या चुकीपायीही माणूस आयुष्यातून उठू शकतो. संजय जमखंडी- वैभव सानप लिखित आणि अनिकेत पाटील दिग्दर्शित ‘दहा बाय दहा’ हे नाटक याच विषयाला हात घालतं. नॉनसेन्स कॉमेडीच्या अंगाने जात शेवटी ते मूळ समस्येकडे येतं आणि त्यातला गंभीर आशय प्रेक्षकांना अंतर्मुख बनवतो.

मोहन घाडीगावकर (विजय पाटकर) हा नाकासमोर चालणारा एक सरळमार्गी मालवणी गृहस्थ. दिवसभर टॅक्सी चालवून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवीत असतो. मोहनची बायको सुनंदा (सुप्रिया पाठारे) हीसुद्धा तशीच साधी-सरळ; व्यवहारी छक्केपंजे न जमणारी. मुलगा रवी (प्रथमेश परब) हा अभ्यासात गती नसलेला, पण याची टोपी त्याला लावण्यात पटाईत. मुलगी रिया (विदिशा म्हसकर) मात्र अभ्यासात हुशार, जगरहाटीतील खाचाखोचा जाणणारी. एकुणात तसं  हे सरळमार्गी कुटुंब. परंतु एके दिवशी ध्यानीमनी नसताना ते अकस्मात संकटात सापडतं.

त्याचं होतं असं : मोहनच्या टॅक्सीतून एक दाम्पत्य विमानतळावर जात असताना त्यातली स्त्री आपली पर्स घाईगडबडीत टॅक्सीतच विसरते. त्यांना सोडून घरी परत येताना मोहनच्या नजरेस ती पर्स पडते. त्या दिवशी त्याच वेळी त्याला मेव्हण्याच्या गावी एका उत्सवासाठी सहकुटुंब जायचं असतं. मोहन पर्समधील मोबाइलवरून त्या दाम्पत्याशी संपर्क साधतो आणि त्यांची पर्स आपल्यापाशी सुरक्षित असल्याचे कळवतो. आपण चार दिवसांकरता गावाला जात असून, परतल्यानंतर त्यांना त्यांची पर्स सगळ्या चीजवस्तूंसह परत करू असं तो सांगतो. मोहनच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आल्याने ते त्याच्या सांगण्यावर विश्वास टाकतात. तेही त्यास राजी होतात.

सुनंदाला गावी जाताना तिची गहाण टाकलेली बोरमाळ सोडवून आणून घालायची असते. पण मोहनकडे तेवढे पैसे नसल्याने तो ती सोडवू शकलेला नसतो. त्याला मिळालेल्या पर्समध्ये एक चारपदरी सोन्याचा हार असतो. (ज्याची किंमत तब्बल अडीच लाख रुपये असते.) सुनंदा गावच्या उत्सवाच्या वेळी तो हार चार दिवस वापरू मागते. नंतर आपण तो हार त्याच्या मालकीणीला परत करायचाच आहे असं ती मोहनला सांगते. पण मोहन या गोष्टीस साफ नकार देतो. दुसऱ्याची वस्तू वापरायला त्याचा सक्त नकार असतो. रवीही पर्समध्ये सापडलेला आयफोन वापरू इच्छितो. त्यालाही मोहन तेच बजावतो. परंतु सुनंदा आणि रवी दोघंही त्याचं ऐकत नाहीत. ते हट्टाने हार आणि  आयफोन गावी घेऊन जातात. उत्सवाच्या गर्दीत कुणीतरी तो हार लंपास करतो आणि घाडीगावकर कुटुंब संकटात सापडतं. मुंबईत परतल्यावर त्या दाम्पत्याला काय सांगायचं हे मोहनला कळत नाही. तो थातुरमातुर उत्तरं देऊन पाहतो. पर्स घेऊन जाण्यासाठी त्या कुटुंबाचा नोकर लामणचोंबे हा गुंडाछाप उंच, तगडा गडी घाडीगावकरांच्या घरी येतो. मोहन त्याला घडलेला प्रकार सांगतो आणि हरवलेल्या हाराची अडीच लाख रुपये किंमत काहीही करून दोन महिन्यांत परतफेड करण्याची ग्वाही देतो. ‘या मुदतीनंतर पैसे मिळाले नाहीत तर बघ..’ अशी धमकी देऊन लामणचोंबे निघून जातो.

हातावर पोट असलेल्या मोहनला एवढी मोठी रक्कम कशी उभी करायची, याचीच चिंता सतावत राहते. घरातला प्रत्येक जण एकेक भारी आयडिया सुचवतो. परंतु त्या सगळ्याच ओमफस ठरतात. शेवटी गळ्यापर्यंत आल्याने मोहन आपले चरितार्थाचे साधन असलेली प्राणप्रिय टॅक्सी विकतो आणि हाराचे पैसे देऊ करतो. पण टॅक्सी विकूनही अडीच लाख रुपये जमत नाहीतच. शेवटी ते सगळे मिळून एक निर्णय घेतात आणि.. नाटकाचं नाव ‘दहा बाय दहा’ असलं, तरी ते राहत्या जागेला नव्हे, तर  चौकटबद्ध मानसिकतेला इथे लागू आहे. संजय जमखंडी व वैभव सानप या लेखकद्वयीने नाटक गंभीर विषयावरचं असलं तरी त्याची रचना विनोदी अंगाने केली आहे. यातील अतिशयोक्त विनोदाचा परमावधी नाटकाचा हेतू स्पष्ट करतो. हे आता कुठवर जाणार असा प्रश्नही एका क्षणी पडतो. परंतु शेवटच्या टप्प्यात नाटक नाटय़ांतर्गत प्रश्नाच्या गंभीर उकलीकडे वळतं. तेव्हा असा प्रश्न पडतो, की मग आतापर्यंत जे सुरू होतं ते काय होतं? त्याचं उत्तर : ‘प्रेक्षकांचं मनोरंजन’ हेच होय. असो. नाटकात वैविध्यपूर्ण विनोदाची मेजवानी अनुभवायला मिळते. पण त्याचंही अति झाल्यावर हसू येणं थांबतं. दिग्दर्शक अनिकेत पाटील यांनी संहितेतील उपरोधिक, उपहासगर्भ अन् अतिशयोक्त विनोदाचं अर्कचित्र प्रयोगात पेश केलं आहे. पण रियासारख्या विचारी, हुशार मुलीलाही त्यात ओढणं उचित वाटत नाही. विजय पाटकर आणि सुप्रिया पाठारे या कसलेल्या, अनुभवी कलावंतांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाने आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: सुप्रिया पाठारे यांची वेंधळट, सरळ मनाची सुनंदा लक्षवेधी आहे. विजय पाटकरांनी मोहन घाडीगावकरांच्या डोक्याचा झालेला काला धमाल अभिव्यक्त केला आहे. रवी झालेला प्रथमेश परब मात्र मोकाट सुटल्यासारखा वाटतो. विदिशा म्हसकरला रियाच्या भूमिकेत हास्यास्पद उक्ती/कृती करायला भाग पाडणं उचित वाटत नाही. तिने तिच्या परीने रंग भरले आहेत. सर्वात छाप पाडून गेलेत ते विविधांगी भूमिका करणारे गौरव मालणकर! प्रत्येक वल्लीचं बेअरिंग त्यांनी अस्सलतेनं टिपलं आहे. संकेत बारेंनी मानेंच्या छोटय़ा भूमिकेत चोख काम केलं आहे. अमिर तडवळकर हे गुंडाछाप लामणचोंबे म्हणून फिट्ट ठरले आहेत.

संदेश बेंद्रे यांनी दहा बाय दहाची खोली तपशिलांनिशी उभी केली आहे. आशुतोष वाघमारेंचं संगीत नाटकाचा मूड पकडणारं. विजय गोळेंची  प्रकाशयोजना, रश्मी सावंत यांची वेशभूषा आणि हितेश पवारांची रंगभूषा नाटय़विषयास पोषक अशीच. एक टाइमपास नाटक म्हणून ‘दहा बाय दहा’ एकदा पाहायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daha by daha natak review mpg
First published on: 27-07-2019 at 22:45 IST