बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांची ‘केमिस्ट्री’ पुन्हा एकदा जुळून आली असून प्रेक्षकांना लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आगामी ‘तमाशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका व रणबीर ही जोडी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटाची झलक (ट्रेलर) नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.
‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटानंतर दीपिका आणि रणबीर त्यांच्या चाहत्यांना ‘तमाशा’च्या माध्यमातून पुन्हा एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. यूटीव्ही मोशन पिक्चर्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली आहेत. या चित्रपटाचे नाव पहिल्यांदा ‘विंडो सीट’ असे ठेवण्यात आले होते. मात्र आता हा चित्रपट ‘तमाशा’ या नावाने प्रेक्षकांसमोर येणार आहे.
भावनांच्या गुंत्यात अडकणे चित्रपटातील नायक आणि नायिकेला आवडत नाही. प्रवासाच्या निमित्ताने दोघांचे एकत्र येणे, त्यांच्यात होणारी मैत्री आणि नंतर होणारे प्रेम व घडणारे प्रसंग चित्रपटाच्या झलकमध्ये पाहायला मिळतात. चित्रपटाच्या शेवटी या दोघांच्या नात्याला एक वेगळीच कलाटणी देण्यात आली आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone and ranbir kapoor in tamasha