हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने सिनेमा ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या आपल्या आगामी सिनेमाच्या अभिनेत्रीसोबत म्हणजे दीपिका पदुकोनसोबत भारतीयांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीच्या दिवसात ‘पॅरामाऊण्ट पिक्चर्स’ने दीपिका आणि विनचं एक व्हिडिओ शूट केलं. यात दीपिकासोबत विनही हिंदी बोलत प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे.
या व्हिडिओमध्ये दोघंही पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत.विनने सब्यसाचीने खास डिझाइन केलेला कुर्ता घातला होता. विनने भारतीय रसिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जे हिंदी बोलले आहे त्याचे कौतुक केले जात आहे. तो म्हणाला, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. त्याचे हिंदी जरी अस्खलित नसले तरी त्याने केलेला प्रयत्न नक्कीच वाखण्याजोगा आहे. दीपिकानेही यावेळी तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हटले की खरा धमाका हा २० जानेवारीलाच होणार आहे. कारण तेव्हा ‘ट्रिपल एक्स’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
याआधी विन डिझेलने दीपिकाबरोबरचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात तो दीपिकाकडून हिंदीचे धडे घेताना दिसत आहे.
हॉलिवूड स्टार विन डिझेज याने फेसबुकवर लाईव्ह होत याची माहिती दिली. दीपिका माझी चांगली मैत्रिण आहे, अशी त्याने सुरुवात केली. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ प्रदर्शित झाल्यानंतर दीपिका कोण आहे, हे संपूर्ण जगाला कळेल, अशा शब्दांत विनने दीपिकाची स्तूती केली होती. ही इतकी स्तूती ऐकून दीपिका विनवर भाळणार नाही तर नवलच.
‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारणाऱ्या दीपिका या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ट्रिपल एक्स’ चित्रपट मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ पुढील वर्षी २० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.