बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रचंड यश मिळावे यासाठी दीपिका सिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेली. सर्व विघ्न दूर होऊन चित्रपटाला भरघोस यश मिळावे यासाठी तिने गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

Tanhaji Movie Review : अभिमान वाटावी अशी शौर्य गाथा

Chhapaak Movie Review : काळजाला भिडणारी ‘रिअल स्टोरी’

‘छपाक’ हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाच्या दिग्दर्शकावर संहिताचोरीचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते. परंतु न्यायालयाने चित्रपटाला हिरवा कंदिल देत प्रदर्शनाची संमती दिली.

परंतु चित्रपटावरील संकट इथेच थांबले नाही. त्यानंतर दीपिकाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला होता. तिने हल्ला पीडित विद्यार्थ्यांच्या बाजूने आपली मते मांडली. परिणामी तिच्या मतांशी सहमत नसलेल्यांनी ‘छपाक’ला प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी दीपिकाला दिली होती. तसेच सोशल मीडियावर #boycottchappak हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला होता. परंतु या सर्व संकटांचा सामना करत अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.