एप्रिल १९९१ला जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधे रात्रौ उशिरापर्यंत रंगलेला शानदार ‘महुरत’ आजही स्पष्ट आठवतोय. चित्रपटाचा निर्माता सुधाकर बोकाडे असल्याने फिल्मवाल्यांची गर्दी व उंची खाना असणार हे स्वाभाविकच होते. पण दिलीपकुमारच्या दिग्दर्शनाचा सोहळा म्हणून या मुहुर्ताला प्रचंड वलय आणि वजन प्राप्त झाले होते. दिलीपकुमारचे समकालीन अभिनेते राज कपूर व देव आनंद यानी आपापल्या विशिष्ट शैलीत आणि चढउतारासह चित्रपट दिग्दर्शन केले. पण दिलीपकुमार बाबतीत तसा योग येत नव्हता. अनेक मान्यवर दिग्दर्शकांकडे त्याने अभिनय केल्याने तर त्याच्या दिग्दर्शनाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली होती.
‘कलिंगा’मध्ये दिलीपकुमार सोबत सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, शिल्पा शिरोडकर, राज किरण इत्यादींच्या भूमिका होत्या. अत्यंत सावकाशीने प्रत्येक काम करण्याच्या त्याच्या शैलीनुसार ‘कलिंगा’ पूर्ण होऊन पडद्यावर यायला बराच काळ जाईल हे अगदीच स्वाभाविक होते. शिल्पा शिरोडकरच्या भेटीत हा चित्रपट व दिलीपकुमारचे दिग्दर्शन याच्या गोष्टी समजत. ती देखील खूप उत्साहात असे.
पण काहीना काही कारणास्तव चित्रपट पूर्ण होणे लांबले. त्याबाबत अधिकृत असे कोठूनही सांगितले जात नव्हते. बजेट प्रचंड प्रमाणात वाढल्याने हा चित्रपट पूर्णत्वाला जाणे लांबतेय अशी एक बातमी पसरली. राज किरणची मानसिक स्थिती बिघडत गेल्याने तो या चित्रपटाला तारखा देत नाही हेदेखील चर्चेत आले. एकदा सुधाकर बोकाडेनेच पत्रकार परिषदेत सांगितले की ‘कलिंगा’ची रिळेच जाळावीत असे वाटते. कारण चित्रपट पूर्णतेचा मार्गच सापडत नाही.
जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेला ‘कलिंगा’ कायमचाच डब्यात गेला. राहिल्या त्या फक्त त्याच्या ग्लॅमरस मुहूर्ताच्या आठवणी. दिलीपकुमारने त्यासाठी आपल्यासोबत काम करणार्या प्रत्येक लहान मोठ्या कलाकाराला अगदी आठवणीने बोलावले होते व मुहूर्त दृश्य चित्रीत होताच तो जवळपास प्रत्येकालाच भेटताना दिसला.
‘कलिंगा’च्या मुहूर्ताला संगीतकार नौशाद यानी क्लॅप दिला. चित्रपटाला मात्र कल्याणजी आनंदजी यांचे संगीत होते.