मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थना ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ यांसारख्या चित्रपटांतून आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरेने दोन वर्षांपूर्वी अभिषेक जावकरशी लग्न केले. पण प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर नेमकं करतो काय हे तुम्हाला ठावूक आहे का?

अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती. पण, कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला त्याच्या मित्राने चित्रपट निर्मिती क्षेत्रात गुंतवले. तेथूनच चित्रपटांच्या रिळी खरेदी करण्यापासून त्याचा प्रवास सुरु झाला. यानंतर त्याने फॉक्स एण्टरटेंमेन्ट आणि हिस्टरी वाहिनीसाठी माहितीपट तयार करण्यास सुरुवात केली.

अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले असून, तो तेथे यशस्वीही ठरला. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केलीये. ‘यमुदू’, ‘गोलिमार’ आणि तेलगूमध्ये डब केलेल्या ‘हॅरी पॉटर’ सीरिजचे वितरणही त्यानेच केले. जवळपास चार वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली. ‘डब्बा ऐस पैस’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केलीये. ‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती अभिषेकसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शनही दिले आहे. प्रार्थना आणि अभिषेक हे मराठी चित्रपटसृष्टीमधील बेस्ट कपल असल्याचे म्हटले जाते.