आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आविष्कार’ नाटय़संस्थेच्या ४६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मुंबईत विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयात ३० व्या  अरविंद देशपांडे स्मृती उपक्रमांतर्गत संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते नाटककार शफाअत खान व नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्या गौरवार्थ नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने ‘आविष्कार’च्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा..

‘आविष्कार’! ऐंशीच्या दशकाच्या अगदी सुरुवातीस मुंबईतल्या दिग्गज नाटय़कर्मीनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था! प्रयोगशील नाटय़निर्मितीचे संस्थेचे उद्दिष्ट तसेच मराठी रंगभूमीच्या इतिहासात ‘छबिलदास नाटय़चळवळ’ या नावाने नोंदले गेलेले संस्थेचे कार्य ही ‘आविष्कार’ची ठळक ओळख. गेली ४६ वर्षे हाडाचे कार्यकर्ते असलेले  नाटय़कर्मी अरुण काकडे हे या संस्थेची धुरा समर्थपणे पेलत असून, आजही प्रायोगिक नाटकांचा झरा अविरतपणे रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘आविष्कार’च्या माध्यमातून सुरू आहे.

प्रयोगशील नाटय़निर्मितीची चळवळ अखंडित सुरू राहावी यासाठी ज्येष्ठ  नाटय़कर्मी अरुण काकडे हे ‘रंगायन’च्या काळापासून- म्हणजे गेली ६५ वर्षे अविश्रांत झटत आहेत. १९५६ साली त्यांनी विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, माधव वाटवे यांच्यासोबत ‘रंगायन’ नाटय़-चळवळीत स्वतला झोकून दिले. श्री. पु. भागवत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘रंगायन’ चळवळीत विविध पिंड-प्रकृतीची नाटके सादर करण्यात आली.  मात्र, १९७० मध्ये संस्थेतील रंगकर्मीमधील मतभेदांमुळे ‘रंगायन’ फुटली आणि त्यातून बाहेर पडल्यावर विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, अरुण काकडे आदींनी नवी नाटय़संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही संस्था म्हणजेच आजची ‘आविष्कार’! संस्थेला हे नाव ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिले. ९ फेब्रुवारी १९७१ रोजी  ‘आविष्कार’ स्थापन झाली व पूर्वीच्या ‘रंगायन’च्या उद्दिष्टांनुसारच प्रायोगिक व समांतर रंगभूमीच्या कार्यास सुरुवात झाली.

‘आविष्कार’च्या स्थापनेनंतर लगेचच संस्थेने ‘तुघलक’ हे पहिले नाटक सादर केले. गिरीश कार्नाड यांच्या या नाटकाचा विजय तेंडुलकरांनी अनुवाद केला होता. १२५ तंत्रज्ञ आणि कलाकार या नाटकात होते. दामू केंकरे यांनी नाटकासाठी भव्य नेपथ्य साकारले होते, तर कोलकात्याहून प्रकाशयोजनेसाठी खास ख्यातकीर्त प्रकाशयोजनाकार तापस सेन हे आले होते. संगीत जितेंद्र अभिषेकी यांचे होते. आणि अरुण सरनाईक यांची नाटकात प्रमुख भूमिका होती. मात्र, या भव्यदिव्य नाटकाचे प्रयोग आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसल्याने त्याचे अवघे दहाच प्रयोग करण्यात आले. आपली नाटके प्रयोगशील, वेगळ्या धाटणीची असल्याने त्यांचा प्रेक्षकदेखील मर्यादित असणार, हे लक्षात घेऊन  एखाद्या छोटेखानी रंगमंचावर ती सादर करावीत, हा विचार पुढे आला. त्यातून छबिलदास चळवळीस प्रारंभ झाला. १९७४ साली छबिलदास शाळेच्या सभागृहात प्रायोगिक नाटकांचे प्रयोग करण्यास आविष्कारने सुरुवात केली. १९७४ ते १९९२ हा छबिलदास चळवळीचा ऐन बहराचा काळ. या काळात अनेक नवीन लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या चळवळीतून पुढे आले. शफाअत खानांसारखे लेखक याच चळवळीतून घडले. इतकेच काय, पं. सत्यदेव दुबे यांनीही या मंचावर नाटके सादर केली. मात्र, १९९२ मध्ये छबिलदास शाळेने हा रंगमंच बंद केल्याने तेथील प्रयोग थांबले. त्यानंतर माहीमच्या म्युनिसिपल शाळेच्या वर्गात ‘आविष्कार’चा संसार सुरू झाला. मग या शाळेतील रंगमंचावर प्रायोगिक नाटके सादर होऊ लागली. ‘आविष्कार’च्या जोडीला ‘चंद्रशाला’ हा बालनाटय़ विभागही सुरू करण्यात आला. ‘दुर्गा झाली गौरी’ हे गाजलेले बालनाटय़ ही ‘चंद्रशाला’चीच निर्मिती.

अरुण काकडे या ध्येयवेडय़ा रंगकर्मीने ‘आविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून आजवर २२५ नाटय़कृतींची निर्मिती केलेली असून, त्यांचे आठ हजारावर प्रयोग केले आहेत. प्रायोगिक नाटकांची निर्मिती हे ‘आविष्कार’चे एकमेव उद्दिष्ट नसून नाटय़निर्मितीसोबतच बाल, तरुण व प्रौढ कलावंतांसाठी नाटय़प्रशिक्षण शिबिरे, नाटय़वाचन, कथा-कवितावाचन, नृत्यनाटय़े, कठपुतळी, समूहगान अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करतानाच प्रेक्षकांमध्ये विविध कलांविषयीची प्रगल्भ जाण विकसित करण्याचेही संस्थेचे ध्येय आहे. त्याबरोबरच अरविंद देशपांडे, चेतन दातार या रंगकर्मीच्या स्मृती जागविण्यासाठी विविध उपक्रमांचेही आयोजन केले जाते. गेल्या ३० वर्षांपासून अरविंद देशपांडे स्मृती नाटय़महोत्सव आयोजित केला जात आहे. यावर्षीच्या या नाटय़महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त नाटककार शफाअत खान आणि नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्या गौरवार्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शफाअत खान लिखित व प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘मुंबईचे कावळे’, तर प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य व दिग्दर्शन असलेले ‘मऊ’ हे नाटक, तसेच शफाअत खान लिखित ‘किस्से’ या नाटकांचे प्रयोग सादर झाले आहेत. रविवारी, १२ फेब्रुवारीला चिराग कट्टी या तरुण कलाकाराचे सतारवादन होणार असून, सोमवारी सायं. ७ वा. साठय़े महाविद्यालयात ‘आजचं मराठी नाटक आजचं आहे का?’ हा परिसंवाद होणार आहे. शफाअत खान हे या परिसंवादाचे अध्यक्ष असतील. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्रा. वामन केंद्रे, सुनील शानभाग, विजय केंकरे, निखिल वागळे, राजकुमार तांगडे आदी वक्ते या परिसंवादात सहभागी होतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama festival by sathaye college