बॉलिवूड सिनेसृष्टी निर्मात्यांमधील कमालीच्या समन्वयासाठी ओळखली जाते. निर्माते अनेकदा एकमेकांशी संपर्क साधून आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा निश्चित करतात. या प्रक्रियेमुळे एकाच वेळी दोन चित्रपट प्रदर्शित होण्याचा धोका टाळता येतो. तसेच तारखा पुढे मागे केल्यामुळे दोन्ही निर्मात्यांना चित्रपटाच्या क्षमतेपेक्षा अधिक आर्थिक नफा देखील मिळवता येतो.

या समन्वयाचे ताजे उदाहरण म्हणजे, गेल्या चार आठवड्यात प्रदर्शित झालेले मिशन मंगल, बाटला हाउस, साहो, छिछोरे, ड्रीम गर्ल हे पाच चित्रपट. या पाचही सुपरहिट चित्रपटांनी मिळून तब्बल ७०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यातील मिशन मंगल व बाटला हाउस हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. परंतु दोन्ही चित्रपटांमधील विषय एकमेकांपेक्षा भिन्न होते. एक चित्रपट विज्ञान क्रेंद्रित होता तर दुसरा क्राईमवर आधारित होता.

साहो २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या जबरदस्त अॅक्शन सीन्समुळे या चित्रपटाने तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने तीन आठवड्यात तब्बल ३५० कोटी रुपयांची कमाई केली होती. छिछोरे हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ड्रीम गर्ल हा चित्रपट या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन आठवड्यात १२० कोटी रुपयांची कमाई केली. भारतात सध्या मंदी सदृष्य वातावरण आहे. या वातारणात इतर अनेक व्यवसाय डबघाईच्या दिशेने जात असताना बॉलिवूडच्या या पाच चित्रपटांनी मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.