रेश्मा राईकवार
एखादा विषय, विचार एकाच वेळी सगळय़ांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटासारखे प्रभावी माध्यम नाही. हे लक्षात घेऊन इतिहासाच्या पानात हरवलेले आणि लोकांपर्यंत पोहोचायला हवेत असे विषय किंवा अशा वास्तव व्यक्तींच्या कथा चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न फारसा होताना दिसत नाही. नासाकडून मिळालेली सर्वाधिक पगाराच्या नोकरीची संधी लाथाडून ‘इस्रो’मध्ये आलेला हुशार वैज्ञानिक ते आपल्यावर लागलेला ‘देशद्रोही’पणाचा डाग पुसून टाकण्यासाठी धडपडणाऱ्या वैज्ञानिकाची कथा आर. माधवन दिग्दर्शित, अभिनित ‘रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट’ या चित्रपटातून पाहायला मिळते. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आर. माधवनने केलेला हा धाडसी प्रयत्न लेखन-दिग्दर्शनात अधिक उमदा होऊ शकला असता. तरीही एक वेगळा प्रयत्न म्हणून त्याची निश्चित दखल घ्यायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चरित्रपटांची गोष्टच वेगळी आहे. चरित्रपट हा त्या एका ठरावीक व्यक्तीची गोष्ट सांगण्यापुरता मर्यादित राहात नाही. त्या व्यक्तीने केलेले काम, त्याचे शिक्षण, त्याला लाभलेला सहवास या अनुषंगाने त्या त्या काळातील अनेक सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक असे संदर्भ त्याहीपेक्षा त्या काळाचे वास्तव तुकडे आपल्यासमोर येत असतात. प्रसिद्ध वैज्ञानिक आणि एरोस्पेस इंजिनीअर असलेल्या नम्बी नारायणन यांचं आयुष्यच मुळी असं साहसाने भरलेलं आणि देशप्रेमाने झपाटलेलं होतं. नासाची शिष्यवृत्ती मिळालेला तरुण, तीन वर्षांचा अभ्यासक्रम काही महिन्यांत पूर्ण करून प्राध्यापकांनाही जिंकणारा आणि थेट नासात नियुक्ती मिळवलेले नम्बी नारायणन त्या वेळी नासाची संधी लाथाडून मायदेशात परतले. विक्रम साराभाई यांच्या सांगण्यावरून इस्रोमध्ये कामाला सुरुवात केलेल्या नम्बी यांनी कुठल्याही सोयीसुविधा नसतानाच्या काळात अवकाशात झेप घेण्याची स्वप्नं पाहिली होती.

लिक्विड फ्युएल रॉकेट तंत्र विकसित करणाऱ्या नम्बी यांनी त्या काळात रशियाच्या नाकाखालून त्यांची क्रायोजेनिक इंजिन्स स्वस्तात भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याहीआधी आंतरराष्ट्रीय करार करून फ्रेंचांच्या हाताखाली ५२ भारतीय वैज्ञानिकांच्या मदतीने रॉकेट इंजिन बनवण्याचे तंत्र त्यांनी शिकून घेतले आणि मायदेशात येऊन त्यांच्यापेक्षा सक्षम इंजिनची निर्मिती केली. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेने त्यांनी जे चमत्कार करून दाखवले त्याचे कौतूक होणे दूरच.. मात्र त्यांच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. आजपावेतो आपल्यावरचा डाग पुसून टाकण्यासाठी दीर्घ न्यायालयीन लढाईला सामोरे गेलेल्या नम्बी नारायणन यांना गेल्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नम्बी नारायणन यांच्या आयुष्यातील भावनिक वादळ, एका वैज्ञानिकाला सहन करावी लागलेली मानहानी, अवकाश संशोधनात अग्रेसर राहण्यासाठी धडपडणाऱ्या विकसित देशांमधील राजकारण, आपल्याच वैज्ञानिकाला मानहानीपासून वाचवण्यात, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यात अपयशी ठरलेली राजकीय व्यवस्था अशा कितीतरी गोष्टींचे, संदर्भाचे पदर या भावनिक कथेतून उलगडत जातात.

‘रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट’ या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही आघाडया अभिनेता आर. माधवन याने सांभाळल्या आहेत. दिग्दर्शनाचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न आणि त्यात एवढा मोठा कथाविषय असलेला पट सांभाळणं ही अवघड जबाबदारी होती. त्यामुळे लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाडय़ांवर काहीसा बाळबोधपणा अनेक ठिकाणी जाणवतो. चित्रपट वास्तव शैलीत मांडण्याचा निर्णय योग्यच आहे, मात्र त्या नादात एका मुलाखतीपासून सुरू होणाऱ्या या चित्रपटात वर्तमानातून उलगडत जाणारा भूतकाळ एका ठरावीक चौकटीतून येतो. एकीकडे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात दिसणारं वर्तमान आणि मग प्रत्येक प्रश्नानिशी होणारा भूतकाळाचा उलगडा हा साधासरळ फॉर्म आहे. हाच साधेपणा टिकवण्याच्या नादात चित्रपट अनेक तांत्रिक गोष्टी समजवण्यात अडकतो. ‘मिशन मंगल’ या चित्रपटाशी तुलना करणे चुकीचे ठरेल, मात्र एकूणच अवकाश संशोधन, त्यातील अभ्यास-तंत्रज्ञान या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना सहज-सोप्या भाषेत उलगडून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न ‘मिशन मंगल’ चित्रपटात करण्यात आला होता. त्या तुलनेत इथे रॉकेटमागचे विज्ञान समजून घेणे भलतेच अवघड ठरते. पूर्वार्धात नासामध्ये शिक्षण घेणाऱ्या नम्बी यांनी केलेले प्रयोग, त्याअनुषंगाने त्यांचे संवाद हे खूप तांत्रिक आणि बोजड आहेत. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात हा चित्रपट अधिक वेग घेतो. या चित्रपटामागचा मूळ उद्देश हा फक्त नम्बी यांचे कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवणे इतका मर्यादित नाही, किंबहूना एका हुशार वैज्ञानिकाची मानहानी, आपल्याच व्यवस्थेतून त्याची झालेली मानहानी, त्यांचे वेदनामय आयुष्य आणि आतापावेतोचा संघर्ष हा जास्त महत्त्वाचा ठरतो. शेवटच्या काही प्रसंगांत नम्बी यांच्या तोंडी एक संवाद आहे, त्यांच्यावर लागलेला डाग पुसून काढण्यासाठी त्यांनी कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबला होता ही जशी बाजू आहे.

तसंच आपण निर्दोष आहोत हे सिद्ध झालं नाही, आपला मान पुन्हा मिळाला नाही तर पुढे विज्ञान-संशोधन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांचा विश्वास उडेल, हा त्यांनी मांडलेला मुद्दा विचार करायला लावणारा आहे. काही क्षेत्रांमध्ये केवळ उदरनिर्वाह हा माफक उद्देश नसतो, तिथे देशसेवेची भावना खूप मोलाची असते. आता देशभरात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा कळीचा आहे. हे सगळं उत्तरार्धात यशस्वीपणे मांडण्याचा प्रयत्न आर. माधवनने केला आहे. मात्र वर म्हटल्याप्रमाणे त्यातील तांत्रिकता अधिक सहज करून सांगता आली असती तर हे नाटय़ आणखी प्रभावी ठरले असते. शिवाय, नम्बी यांच्या भूमिकेत पुरेपूर उतरण्याचा प्रयत्न आर. माधवन यांनी केला आहे. तरी तरुणपणीचे नम्बी म्हणून माधवन यांना स्वीकारणं थोडं जड जातं. शाहरुख खानचा सूत्रधार म्हणून केलेला वापरही योग्य ठरला आहे. इथेही शेवटच्या प्रसंगात नम्बी आणि शाहरुख खान यांच्यातील अबोल संवाद हा जास्त बोलका झाला आहे. मांडणी-लेखनातील विस्कळीतपणा दुर्लक्षित केला तर एक धाडसी विषय मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आर. माधवनला दाद द्यायला हवी.
रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट
दिग्दर्शन – आर, माधवन
कलाकार – आर,माधवन, शाहरुख खान, सिमरन

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effort movies the story of a scientist rocketry the numbi effect writing directing amy
First published on: 03-07-2022 at 00:03 IST