एका दिग्गज, लोकप्रिय चेहऱ्यामागचा चेहरा धुंडाळायला जावं आणि त्याच्या मागे दडलेला वैभवी कर्तृत्ववान इतिहासाचा खजिनाच जणू हाती लागावा, अशी काहीशी अवस्था शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘एक अलबेला’ पाहताना होते. ‘भगवान दादा’ म्हणून आपल्याला परिचित असलेल्या या हिंदीतील एकेकाळच्या मराठमोळ्या सुपरस्टार नटाने त्या काळी आपल्या अंगभूत कलागुणांच्या आधारावर एक साम्राज्य उभं के लं होतं. हजारात एक असलेल्या या गुणी नटाचा वैभवी भूतकाळ तितक्याच दर्जेदार पद्धतीने लोकांसमोर आणल्याबद्दल दिग्दर्शकाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र सिनेमाची बाराखडी गिरवण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘अलबेला’च्या यशापर्यंतच स्थिरावतो त्यामुळे या मनोहारी कथेच्या कोंदणात कुठेतरी त्यांचा जिद्दी संघर्ष त्याची लखलख हरवून बसला आहे, अशी भावना मनात घर करून राहते.
आत्ताच्या पिढीला भगवान दादा हे सत्तर-ऐंशीच्या दशकात आलेल्या चित्रपटातील लहानसहान भूमिकांमधून माहिती आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत शोमन राज कपूर यांची पिढी सक्रिय होण्याआधीच्या काळात कुठूनतरी दादर-परेलच्या चाळीत वाढलेला मराठी तरुण सिनेमाचे वेड घेऊन शिरला होता. हिरोसारखा देखणा चेहरा नाही की सुडौल बांधा नाही तरीही त्याने अॅक्शनपटांचा हिरो म्हणून नाव कमावले. फार थोडय़ा अवधीत त्याने समुद्रालगत असलेला भव्य बंगला, एक चित्रपट स्टुडिओ आणि दिमतीला असलेल्या सात गाडय़ा एवढे वैभव निर्माण केले. अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्याने लौकिक कमावला. एवढा लौकिक की त्यांच्यानंतर आलेल्या राज कपूर यांनाही त्यांच्या कामाचे कौतुक होते, आदर होता. किंबहुना, त्यांच्या कार्याची दखल घेणे शोमनलाही भाग पडले होते. ही चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हरवलेली अद्भुत गोष्ट ‘एक अलबेला’च्या रूपाने पुन्हा पडद्यावर जिवंत झाली आहे. मूकपटांच्या काळात चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या भगवान आबाजी पालव यांचा काळ १९३० नंतरचा असल्याने चित्रपटातून तो काळ उभा करणे हे निश्चितच मोठे आव्हान होते. दिग्दर्शक शेखर सरतांडेल आणि त्यांच्या टीमने हे आव्हान पुरेपूर पेलले आहे. त्यामुळे गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात आपल्या पद्धतीने सहभाग घेणारा तरुण भगवान आपल्याला दिसतो, त्याच्यामागे धावणारे ब्रिटिश सैनिक इथपासून सुरू होणारा प्रवास आपल्याला जुन्या काळात अलगदपणे नेऊन सोडतो.
सिनेमासाठी घरातून पळून जाणं, पानवाल्याच्या ठेल्यावर काम करणं, शाहीनच्या प्रेमात पडणं आणि काहीतरी बनल्याशिवाय प्रेम यशस्वी होणार नाही, हे शाहीनने सांगितल्यानंतर त्यांचं घरी परतणं हा काळाचा एक वेगळाच तुकडा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतो. आपला मित्र बाबुरावच्या मदतीने चित्रपट स्टुडिओत मिळवलेल्या प्रवेशापासून ते दादांचा पहिला चित्रपट ‘क्रिमिनल’, बी ग्रेड सिनेमातून अॅक्शन हिरो म्हणून जम बसवल्यानंतर त्यांचं दिग्दर्शनाकडे वळणं, त्यांची आणि सी. रामचंद्र यांची घनिष्ठ मैत्री ते राज कपूर यांच्या सल्ल्यावरून आपली रुळलेली वाट सोडून ‘अलबेला’सारखा सामाजिक चित्रपट करणं हा सगळा प्रवास पाहण्यासारखा आहे. पण चित्रपटात एका वेगाने दादांचा हा प्रवास पाहायला मिळतो. इतक्या सहजपणे भगवान दादांना इच्छित गोष्टी मिळत गेल्या हे पचायला कठीण जाते. त्या दरम्यान त्यांच्या वाटय़ाला आलेल्या संघर्षांची धार आपल्याला क्वचितच जाणवते, त्यामुळे कुठेतरी ही गोष्ट अर्धवट असल्याची भावना मनात घर करते. चित्रपटाचा पूर्वार्ध हा भगवान दादांचा चित्रपटसृष्टीतील बडे प्रस्थ इथपर्यंत घेऊन येतो. तर उत्तरार्धात ही गोष्ट त्यांचा आजवरचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘अलबेला’भोवती गुंफण्यात आला आहे. राज कपूर यांच्या सल्ल्यावरून त्यांचे सामाजिक चित्रपट निर्मितीकडे वळणे, ‘अलबेला’साठी गीता बालीसारख्या आघाडीच्या अभिनेत्रीला राजी करणं या सगळ्या घटना खूप छान पद्धतीने चित्रपटात आल्या आहेत. अर्थातच, इथे गीता बालीच्या भूमिकेत अभिनेत्री विद्या बालनचा प्रवेश होतो. त्यामुळे विद्या आणि मंगेश यांच्यावर चित्रित झालेली ‘अलबेला’ची गाणी हा उत्तरार्धात प्रेक्षकांना सुखावणारा अनुभव ठरला आहे. ‘आजा रे निंदीया’ या लोरीचे गाडीतले चित्रीकरण असेल किंवा ‘शाम ढले खिडकी तले’, ‘भोली सूरत दिल के खोटे’ आणि यावर कळस म्हणून ‘शोला जो भडके’ या चारही गाण्यांचा नवा अवतार खूपच सुंदर आहे.
भगवान दादांच्या चेहऱ्याशी साधम्र्य राखणारा चेहरा म्हणून अभिनेता मंगेश देसाईच्या हातात ही भूमिका पडली, पण त्याने या भूमिकेचे सोने केले आहे. भगवान दादांच्या लकबी, विशेषत: नृत्य करण्याची त्यांची प्रचलित पण अनोखी स्टाइल, त्यांचे बोलणे या सगळ्याच गोष्टी मंगेशने अतिशय संयतपणे साकारल्या आहेत. विद्या बालनबरोबरही त्याची केमिस्ट्री चांगली जुळून आली असल्याने ‘अलबेला’च्या चित्रीकरणाचा भाग उत्तम जमला आहे. विद्याच्या सहज वावरामुळे चित्रपट एका उंचीला पोहोचतो. पण तिच्याबरोबरच सी. रामचंद्र यांच्या भूमिकेत असलेले विघ्नेश जोशी, चंदूभाईंच्या भूमिकेतील विद्याधर जोशी, पत्नीची भूमिका साकारणारी तेजस्वी पाटील यांच्यासह गाणी ज्यांच्यावर चित्रित झाली आहेत त्या साइड आर्टिस्टनीही आपापल्या भूमिका चोख वठवल्यामुळे चित्रपटात तो जुना काळ छान उभा राहतो. मात्र ‘अलबेला’च्या प्रदर्शनापर्यंतच चित्रपटाचा प्रवास थांबवला असल्याने भगवान दादांची ही कहाणी अधुरी ठरली आहे. ‘अलबेला’ पहिले दोन आठवडे चालला नव्हता, पण त्यानंतर तो चालणारच या दादांच्या विश्वासामागे नेमके काय कारण होते, यासारख्या अनेक गोष्टींचा छडा लागत नाही. दादांना वाटले, त्यांनी आव्हान घेतले आणि ते पूर्ण केले इतक्या सरळसोट पद्धतीने चित्रपटाची पटकथा मांडली असल्याने त्यांचा हा चरित्रपट परिपूर्ण ठरत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीवर एकेकाळी राज्य करणाऱ्या या एका मराठमोळ्या अलबेलाची मनोहारी कथा पाहताना सतत काहीतरी हरवले आहे, ही भावना वरचढ ठरते आणि चित्रपटाचा परिणाम मर्यादित करते. मात्र भगवान दादांच्या काळाची ही एक सैर प्रेक्षकांना नक्कीच स्मरणरंजनाचा अनुभव देणारी आहे.
एक अलबेला
निर्माता – डॉ. मोनीश बाबरे
दिग्दर्शक – शेखर सरतांडेल
कलाकार – मंगेश देसाई, विद्या बालन, विद्याधर जोशी, विघ्नेश जोशी, तेजस्वी पाटील, स्वप्निल राजशेखर, प्रसाद पंडित, पंकज विष्णू.