कलर्स वाहिनीवर सुरू असलेला बिग बॉस हा कार्यक्रम कायमच चर्चेचा विषय असतो. शो स्टार्ससाठी बिग बॉस हा प्रमोशनचा आवडता स्पॉट मानला जातो. आता टीव्ही क्वीन म्हणून ओळख असलेली एकता कपूर बिग बॉसमध्ये दिसणार आहे. यामागचं कारणंही वेगळं आहे. ती एक स्पर्धक म्हणून नाही तर आपल्या आगामी ‘बिच्छु का खेल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये जाणार आहे. एकता कपूरसोबत मिर्झापूरचा मुन्ना भैय्याही बिग बॉसच्या सेटवर दिसणार आहे. पिंकविलानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात एकता कपूर आणि दिव्येंदू वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसणार आहेत. यापूर्वीही एकता कपूर बिग बॉसमध्ये आली होती. परंतु आता ती बिग बॉसच्या घरात एंट्री मारणार आहे. दरम्यान, बिग बॉसचे स्पर्धकही यासाठी आतुर आहेत. फराह खान प्रमाणे तीदेखील स्पर्धकांना काही टास्क देणार का? हे येत्या काही दिवसांमध्ये समजेल.
१८ नोव्हेंबर रोजी अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे. परंतु आता या सीरिजच्या प्रमोशनसाठी एकता कपूर सलमानच्या या शोमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये दिव्येंदूव्यतिरिक्त अंशुल चौहान, झिशान काद्री, राजेश शर्मा, सत्यजित शर्मा, गगन आनंद आणि अभिनव आनंद हे दिसणार आहेत.
