छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती म्हणून एकता कपूरकडे पाहिले जाते. एकता कपूरच्या नागिन मालिकेचे दोन्हीही सिझन फ्लॉप ठरले होते. त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच हे दोन्हीही सिझन ऑफ एअर करावे लागले. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकता कपूरने नागिन मालिकेचा ६ वा सीझन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावरुन तिच्यावर टीका केली जात आहे. तसेच या मालिकेत अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला कास्ट केल्याबद्दलही अनेकांनी तिला ट्रोल केले होते. दरम्यान नुकतंच एकता कपूरने यासर्व टीकांवर स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला असे वाटते की नागिन ६ पर्वाबाबत माझ्यावर पूर्वीपेक्षा कमी दबाव आहे. गेल्या दोन पर्वाची कामगिरी चांगली झालेली नाही. पण जर तुम्ही वीकेंडचे आकडे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ही मालिका इतर शोच्या तुलनेत चांगली सुरु होती. कारण विकेंडचा स्लॉट हा रिकामी आहे. नागिन ४ आणि नागिन ५ ला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण मी सध्या सीझन ६ वर काम करत आहे”, असे एकताने सांगितले.

या शोला करोना महामारीशी जोडण्याचे कारणही एकता कपूरने सांगितले. यावर एकता म्हणाली, “जेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला ही संकल्पना सांगितली तेव्हा मला मी हे करायला हवे असे वाटले. कारण करोना हा केवळ एक आजार नाही, तर ती मन बदलणारी एक गोष्ट आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मी देशाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर काम करत नाही म्हणून मी या कथेत ते जोडण्याचा निर्णय घेतला. पण मला माहिती होतं की यावरुन मला ट्रोल केले जाणार आहे. पण जर एखाद्या प्रसिद्ध निर्मात्याने ते केले असते तर कदाचित या गोष्टी वेगळ्या असत्या. नागिन हा एक शो आहे ज्यावर टीका केली जाते. पण मला या शोमध्ये गेल्या दोन वर्षांत लोकांचे काय हाल झाले ते दाखवायचे आहे.”

“मी ट्रोल होणार हे मला चांगलंच माहित आहे. यासाठी मी आधीच तयार आहे. गेल्या दोन वर्षांत आपण सगळेच बदललो आहोत आणि त्यामुळेच नागिनलाही बदलावे लागले. मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली, तेव्हा हे खूप मजेशीर आहे, असे अनेकांनी म्हटले होते. त्यावेळी लोकांनी केलेले चेहरे मला अजूनही आठवतात. पण नंतर मला वाटले की असे होऊ शकते”, असेही एकता कपूरने सांगितले.

“मला एखादा निरागस चेहरा हवा होता”

या मुलाखतीत एकता कपूरला तेजस्वी प्रकाशला कास्ट करण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “तेजस्वीला आपण त्या मालिकेत बघणार आहोत, याचा मला आनंद आहे. यावेळी मला एखादा निरागस चेहरा हवा होता. मी तेजस्वीला पाहिले आणि त्यानंतर तिच्या मॅनेजरशी बोलून तिला कास्ट केले. त्यावेळी तिने मी हा शो करेन, असे आश्वासन दिले.”

“मी तिला बिग बॉसच्या आधी पाहिले होते आणि मला ती खूप आवडली होती. मी बिग बॉस फारसा पाहिला नाही, पण माझे मित्र ते पाहायचे. ती एक अतिशय आकर्षक तरुण मुलगी आहे. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळी गोष्ट आहे, ज्यामुळे मला तिला कास्ट करावे असे वाटले. मी तिला बिग बॉसपूर्वी कधीही भेटलेली नाही. पण बिग बॉसमध्ये तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि त्यामुळे ती विजेती झाली”, असेही एकता कपूरने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapoor opens up about naagin 6 storyline and why she cast tejasswi prakash for this show nrp