नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यात आघाडीवर असलेली अभिनेत्री राखी सावंतने काही दिवसापूर्वी गुपचूप लग्न केलं. राखीने सोशल मीडियावर तिचे ब्राइडल लूकमधील काही फोटो शेअर केले होते. त्यासोबतच तिने एका एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तिने हनिमुनला गेल्याचे काही फोटोही शेअर केले होते. मात्र आता लग्नाला एक महिना होण्यापूर्वीच तिचा घटस्फोट झाल्याचं समोर येत आहे.

राखीने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने रडणाऱ्या मुलींची अॅनिमेटेड चित्रही शेअर केले होते. तिच्या या पोस्टमधून तिला नेमकं काय झालं आहे याचा उलगडा होत नसल्यामुळे अनेकांनी तिला याप्रकरणी प्रश्न विचारले आहेत. यामध्ये ‘तू घटस्फोट घेते आहेस का?’, ‘ तुझं लग्न मोडलं का?’ असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र या प्रश्नांची राखीने कोणतेही उत्तर दिलेलं नाही.


दरम्यान, राखीने काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये लंडनमध्ये स्थायिक असणाऱ्या रितेश नावाच्या उद्योगपतीशी लग्नगाठ बांधल्याचे सांगितलं होतं. लग्न झाल्याचं समजल्यानंतर मला काम मिळणार नाही या भीतीने मी ही गोष्ट लपवली होती, असंही तिने सांगितलं होतं.