विनोदवीर कपिल शर्माविरोधात पत्रकार विकी लालवानी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. इंग्रजी वेबसाइट स्पॉटबॉयचे विकी लालवानी संपादक आहेत. या तक्रारीत त्यांनी कपिलकडून त्यांना शिवीगाळ केल्याची आणि धमकवल्याची माहिती देण्यात आली आहे. पवई पोलीस स्थानकात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस सगळे पुरावे गोळा करत आहेत. पुराव्यानंतर विक्की आणि कपिल दोघांचीही चौकशी करण्यात येईल. काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये कपिल शर्मा विक्की लालवानी यांना अश्लिल शिवीगाळ करण्यात आली होती.
या ऑडिओमध्ये कपिल विक्कीला त्याच्याबद्दल नकारात्मक बातम्या छापल्यामुळे शिवीगाळ करताना दिसत आहे. विक्की त्याला स्पष्टीकरण देताना दिसतो. पण कपिल काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. आधीपासूनच कपिलच्या प्रतिमेला तडा गेला होता. पण आता या ऑडिओ क्लिपमुळे त्याची प्रतिमा अजून डागाळली गेली आहे. या एफआयआरचा त्याच्या फॅमिली टाइम विथ कपिल या रिअॅलिटी शोवर त्याचा परिणाम दिसून येईल.
कपिलच्या या शिवीगाळ प्रकरणात टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने कपिलचे समर्थन केले होते. फक्त शिल्पाच नाही तर कृष्णा अभिषेकनेही त्याचे समर्थन केले आहे. तर कपिलची सहकलाकार उपासना सिंह म्हणाली होती की, कपिल असे काही बोलू शकेल याच्यावर तिचा विश्वासच नव्हता. ती ऑडिओ क्लिप ऐकल्यावर उपासनाला तिच्या कानांवर विश्वास ठेवणे कठीण गेले होते. कपिलचा हा वाईट काळ सुनील ग्रोवरसोबतच्या भांडणानंतर सर्वांसमोर यायला सुरूवात झाली. मधल्या काळात कपिल शर्मा काही महिन्यांसाठी प्रसारमाध्यमांपासून दूर गेला होता. आता त्याने पुन्हा काम सुरू केले असता त्याच्या मागचे दृष्टचक्र काही केल्या थांबत नाही असेच म्हणावे लागले.