बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आज १६ जानेवारी रोजी ३५वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याचा आगामी चित्रपट ‘शेरशाह’चे तीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत दिसणार असून तो कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार आहे.
सिद्धार्थ ‘शेरशाह’ चित्रपटात १९९९ मध्ये कारगिल युद्धात शहिद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्राची, कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार आहे. युद्धभूमीवर आपल्या अद्वितीय कामगिरीने शत्रूला गारद करणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या शौर्याची गाथा ‘शेरशाह’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
सिद्धार्थने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्टन विक्रम बत्रा यांना आदरांजली वाहिली आहे. तसेत त्यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही ‘शेरशाह’ चित्रपटाच्या माध्यमातून करत आहोत, हा चित्रपट ३ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे असे त्याने सांगितले आहे.
‘शेरशाह’ चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन करत आहेत. संदीप श्रीवास्तव यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट ३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कोण आहेत कॅप्टन विक्रम बत्रा?
विक्रम बत्रा यांनी त्यांचे शिक्षण चंदीगढमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिट्री अकादमीमध्ये प्रवेश घेतला. लष्करात त्यांचा प्रवास लेफ्टनंट पदापासून सुरु झाला. हा प्रवास त्यांना कारगिल युद्धातील कॅप्टन पदापर्यंत घेऊन गेला. कारगिल युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मीर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धातील आपली कामगिरी पार पाडून बत्रा आपल्यासोबतच्या जखमी झालेल्या सैनिकांना घेऊन येत होते. त्यावेळी शत्रूने केलेल्या हल्ल्याचे ते लक्ष ठरले. शत्रूच्या एका गोळीने देशाचा हा जवान शहीद झाला. अवघ्या २४ व्या वर्षी हा तरुण सैनिक आपल्या साथीदारांना प्रेरणा देत होता. इतक्या लहान वयात देशासाठी प्राण देणाऱ्या या तरुणाची कहाणी हृदय हेलावून टाकणारी आहे. हिच कहाणी ‘शेरशाह’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.