जे काही असेल ते असो मराठी चित्रपट आणि प्रेमकथा यांचे पूर्वी फारसे मेतकूट जमायचे नाहीच. प्रेमाच्या गोष्टी असत पण कोवळ्या वयातील प्रेमकथा व त्यात अगदी नवीन चेहरे अशा घट्ट समिकरणाशी पूर्वी मराठीला वावडेच असे. एखादा ‘प्रीत तुझी माझी’ (१९७५) यायचा पण त्यावरचा ‘बॉबी’ (१९७३) चा प्रभाव एवढा व असा जाणवला की तसे मोकळेढाकळे प्रेम हिंदीतच बरे असा सुज्ञ मराठी प्रेक्षकांनीच कौल दिला. बालकलाकार म्हणून यशस्वी ठरलेला महेश कोठारे याच चित्रपटातून वयात आला तर गोवा सुंदरी राधिका बारटक्के त्याची प्रेयसी होती. तेव्हा मराठीच्या पडद्यावर शॉर्टसमधे नायिका म्हणजे अबब काय हे? छे छे….. या चित्रपटाचे अपयश जणू धुवून काढण्यासाठीच महेशने कालांतराने ‘जिवलगा’ (१९९२) या प्रेमकथेचे दिग्दर्शन केले. थोडेसे संभ्रमात पडलात का? महेश कोठारेचा चित्रपट म्हणजे तो ‘धूम धडाका’, ‘दे दणादण’, ‘झपाटलेला’ असा पाच अक्षरी असताना हा चारच अक्षरी कसा असाच तुमचा प्रश्न असणार. एवढेच नव्हे तर या चित्रपटात खुद्द महेश कोठारेच नव्हता. ‘डॅम इट!’ महेश व निर्माता अरविंद सामंत यांच्या या प्रेमपटाची कथा पटकथा महेशचीच होती व तुषार दळवी व रेशम टिपणीस अशी अगदी तजेलदार नवीन जोडी यात त्यानी जमवली. हॅन्डसम तुषार व ग्लॅमरस रेशम विलक्षण आत्मविश्वासाने सेटवर वावरत त्यावरूनच त्यांच्या रुपेरी सहजतेने दर्शनाची खात्री पडली. ‘जिवलगा साजणा प्राणप्रिया…’ या प्रेमगीताचा खास उल्लेख हवाच. आपल्या रुपेरी पदार्पणाबाबतचा रेशमचा अक्षरश: भन्नाट उत्साह आजही स्पष्ट आठवतोय. दादरच्या घरी तिची मोकळी ढाकळी मुलाखत घेतली होती. महेशचा चित्रपट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे असायलाच हवा. मोहन जोशी, शिवाजी साटम, किशोरी अंबिये, रवीन्द्र बेर्डे व रिमा लागू हे आणखीन काही कलाकार. मराठीत अशा प्रेमपटाची असणारी आवश्यकता ‘जिवलगा’ने पूर्ण तर केली. पण तरी तोच नेहमीचाच प्रश्न मराठीतील सामाजिक कौटुंबिक चित्रपटांच्या वाटचालीत अशा प्रेमपटांना स्थान ते काय हो? नेमका तेव्हाच मराठी चित्रपट ‘माहेरची साडी’ (१९९१) च्या यशापासूनच्या सोशिक नायिका म्हणजेच यश या टप्प्यावर होता… महेशच्या चित्रपटात हमखास असणारे सणासुदीचे भक्तीगीत (अंबाबाईच्या नावाने उदे…) या रंगतदार प्रेमपटात होतेच.