‘तिरंगा’साठी त्याने हेच सूत्र अवलंबिले व याच चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना चक्क दोनदा बोलावले. पहिल्या वेळेस फिल्मालय स्टुडिओत बारच्या सेटवर बोलावले तेव्हा नाना पाटेकर, बिंदू, अपूर्व अग्निहोत्री व ममता कुलकर्णीवर ‘मौज-मजा-मस्ती’चे गीत चित्रीत होत होते. अर्थात सेटवर नानाचा कमालीचा दबदबा जाणवला. दुसर्यांदा सेटवर जाणे अधिकच रोमांचित करणारे होते. अर्थात सेटवर जानी राजकुमार व नाना यांच्यासह चित्रपटातील लष्करी अधिकारी यांच्यावर पार्टी गीत चित्रीत होत होते,
पीले.. पीले..ओ मोरे राजा
दारु पिऊन नृत्य-गीत सादर करण्याचा अभिनय सोपा की अवघड हा कदाचित वेगळाच विषय ठरेल. दोघे मात्र उत्तम समन्वय साधून काम करीत होते. मेहुलकुमार अधेमधे कोणतीच सूचना करीत नव्हता. दोन दृश्यांच्या मधल्या काळात जानी त्याच्या नावाच्या खुर्चीवर जाऊन बसे. नाना मात्र छान गप्पांत रमे व या चित्रपटाचे अनुभव सांगे. वर्षा उसगावकार यामध्ये त्याची नायिका होती. दुपारचा लंच ब्रेक होताच राजकुमार एका रूममध्ये गेला. व्यक्तिगत आयुष्य जपणे म्हणजे काय याचे हे उत्तम उदाहरण. बरोबर एक तासाने तो बाहेर आला. अशी त्याने स्वतःसाठीच शिस्त लावून घेतली होती. त्याच्याबद्दल काहीही किस्से दंतकथा असोत. प्रत्यक्षात तो व्यवस्थित काम करीत होता. प्रचंड गोरा गोमटा व दणकट करारी राजकुमारला साक्षात पहाणे म्हणजे रोमांचक अनुभव ठरला. या गाण्याच्या चित्रीकरणाची बरेच दिवस भरपूर चर्चा रंगली.
आणखीन एक विशेष, त्यावेळेस चित्रीकरण झालेला हा बंगला काही वर्षांनी शाहरुख खानने विकत घेतला व आज तो मन्नत नावाने प्रसिद्ध आहे. ‘तिरंगा’ नावाप्रमाणेच देशभक्तीचा चित्रपट. फार काही जबरदस्त वगैरे नव्हता. पण राजकुमार व नाना पाटेकर एकत्र येणे या चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरले. काही वेळेस चित्रपटाच्या यशाला तेवढेही पुरेसे असते. एक वेगळी आठवण सांगायची तर जेव्हा राजकुमार व वर्षा उसगावकारची भेट झाली तेव्हा तो तिला म्हणाला, ‘आपकी ऑखो मे अजिब की कशिश है…’ वर्षा यावरून केवढी तरी सुखावली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राजकुमार व नाना हे एकत्र बसले हे कॅमेरा हमखास दाखवे. दोन मोठे कलाकार एकत्र येण्याने किती तरी गोष्टी होतात ना?
दिलीप ठाकूर