विख्यात दिग्दर्शक डॉ. व्ही. शांताराम यांची ११६ वी जयंती आणि ‘राजकमल’ या निर्मिती संस्थेच्या पंच्याहत्तरीचे निमित्त साधत गुगल डुडल आणि व्ही. शांताराम फांउडेशनतर्फे आजपासून एका अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गुगल डुडल या वेबसाईटवर ‘A Colossus of Indian Cinema’ या लिंकवर व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारलेले व्हर्च्युअल प्रदर्शन आजपासून चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : ‘राजकमल’ ७५ वर्षांची वैभवी वाटचाल

व्ही. शांताराम मोशन पिक्चर फांउडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमानाने हे अनोखे प्रदर्शन रसिकांसाठी खुले झाले आहे. शांतारामबापूंच्या चित्रपट कारकिर्दीविषयीचा दीर्घ आढावा घेण्यात आला आहे. शांतारामबापूंच्या जन्मापासून ते त्यांचे चित्रपटसृष्टीमधील पदार्पण, ‘प्रभात’मध्ये त्यांच्या प्रतिभेला फुटलेले धुमारे. तसेच त्यानंतर ‘राजकमल’ची स्थापना करून निर्मिलेल्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांबाबत या प्रदर्शनात माहिती देण्यात आली आहे.

‘गुगल डुडल’ वेबसाईटवर कला आणि संस्कृती नावाचा एक विशेष विभाग आहे. या विभागात शांतारामबापूंना मिळालेले सर्व पुरस्कार, स्टुडिओतील चित्रीकरणाच्या जागा, ध्वनिमुद्रण स्टुडिओ यांची दृश्यफीतही चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच शांतारामबापूंनी दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांची वेगवेगळ्या आकारामधील दुर्मिळ पोस्टर्स आणि छायाचित्रेही या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत. चित्रपट अभ्यासक तसेच माहितीपट निर्माते-दिग्दर्शक संजीत नार्वेकर यांनी या प्रदर्शनाचे लेखन आणि मांडणी केली आहे.

वाचा : अश्लील मेसेज पाठवणाऱ्या युजरला श्रुती मराठेने सुनावले खडे बोल

गुगलच्या या उपक्रमाव्यतिरिक्त ‘व्ही. शांताराम फांउडेशन’तर्फेही आज त्यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केला जाणार आहे. व्ही. शांताराम यांचे ‘शांताराम’ हे आत्मचरित्र खूप गाजले. या आत्मचरित्राची मराठी आणि हिंदी आवृत्ती आता ‘बुकगंगा’ या वेबसाईटद्वारे जगभरात ई-बुक स्वरूपात उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एक परिपूर्ण दिग्दर्शक अशी व्ही. शांताराम यांची ख्याती आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते, कल्पक संकलक, वेगळी दृष्टी असलेले दिग्दर्शक आणि निर्माते होते. अनेक गुणवैशिष्ट्ये असलेल्या व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शनची एक नवीन पद्धत रूढ केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांचे तरंग त्यांच्या चित्रपटांमध्ये उमटले होते. १९३० च्या दशकातील मूक चित्रपटांपासून ते १९८० च्या दशकामधील डिजिटल चित्रपटांच्या युगाचे ते साक्षीदार होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google remembers legendary filmmaker v shantaram with a doodle