सिनेमा, सौजन्य –
चेन्नई एक्स्प्रेस, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा, मद्रास कॅफे, सत्याग्रह.. पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणारे बडय़ा बॅनरचे, बडय़ा अभिनेत्यांचे हे चार सिनेमे.. चित्रपट रसिकांचं आत्तापासूनच त्यांच्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
व्यावसायिक की प्रायोगिक हा वाद बॉलीवूडने कधीच मागे सोडला आहे. प्रयोग मग तो तंत्राच्या बाबतीत असेल, आशयाच्या बाबतीत असेल किंवा कलाकारांच्या बाबतीत असेल.. तो प्रयोग व्यावसायिकतेच्याच चौकटीत यशस्वी करून दाखवला पाहिजे, हा बॉलीवूडच्या तरुण दिग्दर्शक फळीचा फं डा आहे. आणि म्हणूनच २०१३ हे वर्ष बॉलिवुडसाठी एका अर्थाने वेगळे ठरेल कारण चित्रपटाच्या बाबतीततले सगळे प्रयोग बॉक्स ऑफिसवर यावर्षी दिसणार आहेत. किंबहुना, आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर भले पडला असेल किंवा जेमतेम निर्मितीचा खर्च वसूल करण्याइतपतच उडी त्याला घेता आली असली तरी समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या मते तो चांगला आहे की नाही, यानुसार लोकप्रियतेचे निकष लावण्यावर सध्या बॉलीवूडचा भर आहे. म्हणूनच भले विक्रमादित्य मोटवनेचा ‘लूटेरा’ तिकीट बारीवर सपशेल आपटला असला तरी त्याला समीक्षकांनी ‘हिट’चाच कौल दिला आहे. आणि याच ट्रेडला अनुसरून येणाऱ्या चित्रपटांचा धांडोळा घ्यायचा झाला तर ‘ऑगस्ट’ महिना हा बॉलीवूडसाठी धमाकेदार असणार आहे.
ऑगस्टचा पहिलाच आठवडा सोडला तर महिनाभर अगदी दर आठवडय़ाला एक असा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आणि हे चारही चित्रपट बिग बजेट आहेत, तथाकथित मोठे कलाकारही यात आहेत. पण, तरीही नेहमीच्या व्यावसायिक पठडीपेक्षा थोडे हटके आहे. प्रत्येक चित्रपटामागे एका बदलाची कथा तरी निश्चित दडलेली आहे. या धमाक्याची सुरूवात अर्थात बॉलिवुडच्या किंग खानकडून होणार आहे. ‘जब तक है जान’नंतर शाहरूखचा पुढचा चित्रपट क सा असेल, कोणता असेल, याबद्दल उत्सूकता असणं साहजिकच होतं. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्या यशराज बॅनरचा नायक म्हणून शाहरूखने इतकी वर्ष प्रेमपट रंगवले. त्या बॅनरची सगळी सूत्रे आदित्य चोप्राच्या हाती गेल्यानंतर सगळा यशराजच्या चित्रपटांचा नूरच पालटला आहे. ‘एक था टायगर’साठी सलमान खान तर ‘धूम ३’साठी चक्क आमिर खान..अशी पावले पडल्यानंतर तथाकथित नायकाच्या प्रतिमेत अडकलेल्या शाहरूखसाठी अस्त्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. आत्ताआत्तापर्यंत यशराज ते धर्मा म्हणजे करण जोहर इथपर्यंतच अदलाबदलीचा खेळ खेळण्यात रमलेल्या शाहरूखला बॉलीवूडच्या या बदलत्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी कोषातून बाहेर पडणे आवश्यक झालं होतं. कारण, करणनेही निर्माता म्हणून छोटय़ा पण वेगळ्या आशयाच्या चित्रपटनिर्मितीत रस घेतला आहे. त्याहीपेक्षा आता आलेली कलाकारांची तरुण पिढी करणच्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी आल्याने शाहरूखच्या वाटय़ाला येणाऱ्या चित्रपटांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिेले. यातून हलकाफुलका मार्ग निघाला तो रोहित शेट्टीमुळे. ‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘बोलबच्चन’या चित्रपटांनी रोहित शेट्टीचे दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमधील स्थान बळकट केले. त्यातही विनोद हा प्रकार तसा शाहरूखला मानवणारा असल्याने त्याने रोहितशी हातमिळवणी करत ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा घाट घातला. योगायोगाने यावर्षीच्या ईदला आपला चित्रपट नाही, असे सलमानने जाहीर केल्यानंतर यावर्षीची ईदी शाहरूखच्या पदरात पडली. आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ ईदलाच धावावी, यासाठी शाहरूखने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ‘चेन्नई एक्स्प्रेस’बद्दल उत्सूकता निर्माण व्हावी, यासाठी अगदी पहिल्या पोस्टर आणि प्रोमोजपासून त्याने जोरदार मार्केटिंग सुरू केले. यात दीपिका त्याची नायिका आहे. दीपिकाबरोबर ‘ओम शांती ओम’मध्ये शाहरूखला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी ही जोडी प्रेक्षकांना नवखी नाही. हा चित्रपट शाहरूखसाठी जसा वेगळा ठरला आहे तसाच तो यशस्वी झाला तर दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीलाही एका नव्या वळणावर नेऊन सोडणारा हा चित्रपट ठरेल.
आजवर रोहितने केवळ अजय देवगणबरोबर चित्रपट केले आहेत. पहिल्यांदाच तो शाहरूखसारख्या टॉपच्या कलाकाराला घेऊन चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. त्यामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला तर आपोआपच शंभर कोटीच्या नायकांची दारे त्याच्या चित्रपटासाठी सहज उघडली जातील. वेगात येऊन धडकलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मुळे १५ ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडलेला दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल तो म्हणजे एकता कपूरच्या बालाजी पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’. पहिला चित्रपट जिथे संपतो तिथपासूनच या सिक्वलची कथा सुरू होते. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’मध्ये सुलतान मिर्झा (अजय देवगण)ला संपवून शोएब खान (इम्रान हाश्मी) त्याची जागा घेतो आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये आपला कारभार वाढवतो. मिलन ल्युथारिया दिग्दर्शित हा चित्रपट मागच्या कथेवरून पुढे सरकणारा असला तरी दोबारा येताना त्यातला शोएबचा चेहरा बदलण्यात आला आहे. इम्रान हाश्मीच्या जागी अक्षय कुमारने शोएबची भूमिका केली असून त्याच्या जोडीला सोनाली बेंद्रे, सोनाक्षी सिन्हा आणि इम्रान खान यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून मिलन ल्युथारियासाठी वेगळे आव्हान ठरेल कारण पात्रे वेगळी असली तरी गॅंगवॉरभोवती फिरणारी ही कथा फार वेगळी नाही. अशावेळी तगडय़ा कलाकारांवर त्याची भिस्त असणार आहे. अक्षयनेही आत्तापर्यंत कधी मिलनबरोबर काम केलेले नाही तसेच आत्तापर्यंत चॉकलेट बॉय प्रतिमेत अडकलेल्या इम्रान खानसाठीही हा चित्रपट वेगळा आहे. यात त्याला अक्षयकुमारबरोबर स्वत:ची जागा निर्माण करता आली तर सलग फ्लॉप चित्रपटांचे दुष्टचक्र त्याला भेदता येईल. तर अक्षयच्या खात्यात यावर्षी ‘स्पेशल २६’ पाठोपाठ आणखी एक यशस्वी चित्रपट जमा होईल.
ऑगस्टचा मधला आठवडा हा पुन्हा एकदा ‘विकी डोनर’च्या निर्माता-दिग्दर्शक जोडीचा आहे. ‘विकी डोनर’ चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून सुरूवात केलेल्या जॉन अब्राहमने दिग्दर्शक शुजित सरकारच्या ‘मद्रास कॅफे’त मुख्य भूमिका केली आहे. ‘विकी डोनर’ या पहिल्याच चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून यश मिळवल्यानंतर शूजितच्या दुसऱ्या चित्रपटाबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. अर्थात, ‘मद्रास कॅ फे’चा विषय पूर्णपणे वेगळा आहे. हा चित्रपट एलटीटीईवर आधरित असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे श्रीलंकन तामिळी लोकांकडून या चित्रपटाला विरोध होत आहे. किंबहुना, या चित्रपटामुळे एलटीटीई संघटनेच्या कार्यकर्त्यांवरही परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप संघटनेने घेतला आहे. तरीही या गरमागरम वादाच्या पाश्र्वभूमीवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे जॉन अब्राहम आणि नर्गिस फाकरी अशी वेगळी जोडी पहायला मिळणार आहे. जॉन अब्राहमच्या उतरणीला लागलेल्या कारकिर्दीला वाचवण्यासाठीही ‘मद्रास कॅफे’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. आणि आता राहता राहिला तो शेवटचा आठवडा वर्षभर ज्या चित्रपटाची चर्चा झाली आहे त्या प्रकाश झांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटाचा असणार आहे.
बरोब्बर वर्षभरापूर्वी १५ ऑगस्टला दिग्दर्शक प्रकाश झा यांनी सर्व वृत्तपत्रांमध्ये आपल्या ‘सत्याग्रह’ चित्रपटाची दोन पानं भरून जाहिरात दिली होती. २०१३ च्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याची जाहीर घोषणाही झा यांनी केली होती. पण, नेमकी माशी कुठे शिंकली हे कळायला मार्ग नाही. झा यांच्या मते पहिल्याच आठवडय़ात ‘चेन्नई एक्स्प्रेस’ प्रदर्शित होणार असल्याने त्याचा मोठा फटका दुसऱ्या आठवडय़ातील चित्रपटाला बसणार. आणि इतकी मोठी स्टारकास्ट घेऊन केलेल्या ‘सत्याग्रह’साठी कोणताही धोका पत्करायची झा यांची तयारी नव्हती. त्यामुळे हा चित्रपट १५ ऑगस्टवरून मग २३ ऑगस्ट आणि नंतर थेट ३० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला गेला. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ नंतर ‘मद्रास कॅफे’ असे दोन चित्रपट प्रदर्शित होत असले तरी रूढार्थाने ते ‘सत्याग्रह’साठी मारक ठरणार नाहीत, असा झा यांचा तर्क आहे. त्यामुळे ते दोन आठवडे ‘सत्याग्रह’बद्दलची उत्कंठा वाढवण्यासाठी पुरेसे आहेत, असे गणित मांडून तो ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात प्रदर्शित करण्याचा निर्णय झा यांनी घेतला आहे. ‘सत्याग्रह’ नावातच चित्रपटाचा विषय दडला आहे. हा चित्रपट अण्णा हजारे यांच्या सत्याग्रहाशी संबंधित नाही, असे कित्येकदा सांगून झा थकले असले तरीही कुठेतरी अण्णांच्या आंदोलनाचा प्रभाव या चित्रपटावर नक्कीच आहे. शिवाय, अगदी अमिताभ बच्चनपासून अजय देवगण, करीना क पूर ते अर्जुन रामपाल पर्यंत झा यांचे सगळे आवडते कलाकार या चित्रपटात एकत्र आले आहेत. त्यामुळे आशय आणि अभिनय या दोन्हीच्या बाबतीत चित्रपटाचे पारडे नक्कीच जड आहे. त्यामुळे कानामागून आला आणि तिखट झाला या म्हणीप्रमाणे शेवटी प्रदर्शित होऊन पहिला क्रमांक मिळवण्यासाठी ‘सत्याग्रह’ची टीम उत्सूक आहे. बॉलिवुडच्या तिकीटबारीचे काय होईल ते होवो.. चित्रपटप्रेमींसाठी मात्र महिन्याचा शुभारंभ आत्ताच्या सुपरस्टार किंग खानच्या चित्रपटापासून होणार असून शेवट आजही शतकातला सुपरस्टार म्हणून गणल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2013 रोजी प्रकाशित
ब्लॉकबस्टर ऑगस्ट!
चेन्नई एक्स्प्रेस, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा, मद्रास कॅफे, सत्याग्रह.. पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणारे बडय़ा बॅनरचे, बडय़ा अभिनेत्यांचे हे चार सिनेमे.. चित्रपट रसिकांचं आत्तापासूनच त्यांच्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
Written by badmin2
First published on: 02-08-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi movies releasing in august