मराठी चित्रपटांतून मनोरंजनासह सामाजिक समस्यांवरही भाष्य केलं जातं. ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या ‘कनिका’ या थरारपटातून स्त्री भ्रूण हत्येच्या प्रश्नाचा वेध घेण्यात येणार आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटांतला एक वेगळा प्रयोग ठरणार आहे.
स्त्री भ्रूण हत्या हा सामाजिक प्रश्न आहे. अनेक प्रकारे सामाजिक जागृती करून परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. स्त्री भ्रूण हत्येच्या घटना सातत्याने उघडकीला येत आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘कनिका’ हा थरारपट लक्ष वेधून घेत आहे. आताच्या काळाशी सुसंगत असलेली कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. अत्यंत वेगळ्या धाटणीची कथा हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे.
या चित्रपटात शरद पोंक्षे, स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी अशी उत्तम स्टारकास्ट आहे. दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांनीच या चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात एकही गाणं नाही. सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सच्या संदीप मनोहर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमेय नारे यांनी संगीत, कुलदीप मेहन यांनी संकलन केलं आहे.
‘स्त्री भ्रूण हत्या हा खूप  संवेदनशील विषय आहे. मराठीत हा विषय फारच कमी हाताळला गेला आहे. याचं गांभीर्य समाजाला कळलेलं नाही. स्त्री भ्रूण हत्या या विषयाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न ‘कनिका’ या चित्रपटातून केला आहे. मराठीमध्ये थरारक सूडकथा हा वेगळा प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना नक्की आवडेल,’ असं दिग्दर्शक पुष्कर मनोहर म्हणाले.
अभिनेता शरद पोंक्षे यांनी या चित्रपटाविषयी सांगितले की, ‘मराठीतला पहिला हॉररपट म्हणून ‘कनिका’ प्रेक्षकांपुढे येत आहे. मात्र, केवळ थरारपटापुरता हा चित्रपट मर्यादित नाही. तर अत्यंत परखड आणि जबरदस्त असं सामाजिक भाष्य हा चित्रपट करतो. या चित्रपटात माझी प्रमुख भूमिका आहे. दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांच्यासह काम करताना खूप मजा आली. चित्रपटाच्या उच्च निर्मिती मुल्यांसाठी त्यांनी काहीही कसूर केलेली नाही. अतिशय विचारपूर्वक हा चित्रपट साकारला आहे. डॉल्बी साऊंड, सिनेमास्कोप अशा उत्तम तंत्रज्ञानाचा वापर चित्रपटासाठी केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हॉरर अनुभव चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा.