कॉमेडियन कपिल शर्माचा शो बंद होणार असल्याची बातमी ऐकताच अनेकांचीच निराशा झाली. गेल्या काही दिवसांपासून कपिलची तब्येत बरी नसल्याने ‘द कपिल शर्मा शो’चं शूटिंग होत नव्हतं. म्हणूनच कपिलला ब्रेक देण्यासाठी सोनी वाहिनीकडून हा निर्णय घेण्यात आला. मात्र आपण पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने परत येणार असल्याचं आश्वासनं कपिलने प्रेक्षकांना दिलं. यासोबतच त्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शोचं शूटिंग सातत्याने का रद्द केलं जात होतं याचंही स्पष्टीकरण दिलं.

‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर कपिलची वाट पाहून सेलिब्रिटी परतल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. कपिलची तब्येत बरी नसल्याने शूटिंग रद्द करण्यात येत असल्याचं ऐकायला मिळत होतं. तर कपिल शर्मा यश पचवू शकला नाही असंही अनेकांना वाटत होतं. मात्र यामागचं नेमकं सत्य कोणालाच माहित नव्हतं. याबाबत कपिल म्हणाला की, ‘सेलिब्रिटींना मी ताटकळत कसा ठेऊ शकेन? या सर्व चर्चांमध्ये काही तथ्य नाही. सेलिब्रिटींमुळेच माझ्या शोला ओळख आहे. त्यांच्यासाठी माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे. माझ्या शोपेक्षा मी मोठा नाही. सेलिब्रिटींना वाट पाहत ठेवून शूटिंग रद्द करण्यासाठी मी मूर्ख नाही. यातून मला काय मिळणार आहे? माझ्यासोबत काम करणाऱ्यांना तुम्ही याबाबत विचारु शकता. काही लोक इतरांसाठी खूश होऊ शकत नाहीत आणि अशा अफवा पसरवणं त्यांना आवडतं. एखाद्याला खाली पाडणं त्यांना आवडतं.’

वाचा : कंगनाबद्दल अध्ययन म्हणतो…

त्याचप्रमाणे आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचंही त्याने म्हटलं. ‘गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. सतत काम करुन मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता दुर्लक्ष करुन चालणार नाही. माझा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाल्याने पुढे माझं वेळापत्रक व्यग्र असेल. म्हणूनच मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय आणि सुदैवाने चॅनलनंही माझी साथ दिली,’ असंही तो म्हणाला.