दोन दशकांपेक्षाही जास्त काळ त्याने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि अजूनही करत आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान. बॉक्स ऑफिसवर त्याच्या सिनेमांनी कोटी रुपयांची कमाई केलेली असो किंवा एखादा अपयशी ठरलेला सिनेमा. त्याच्या प्रत्येक सिनेमाची चर्चा ही होतेच. आजही तो सिनेमा स्वतःसाठी बनवतो की समिक्षकांसाठी असा जेव्हा त्याला प्रश्न विचारला गेला तेव्हा ५१ वर्षीय या अभिनेत्याने याचे सरळ उत्तर दिले, तो म्हणाला की, ‘मला स्वार्थी किंवा उद्धट बनायचे नाही. पण मला स्वतःला असे वाटते की, अभिनेता किंवा अभिनेत्री हे सिनेमे समिक्षकांना कसे वाटतात यासाठी करत नाहीत, तर ते स्वतःसाठी करतात. मी माझ्या आयुष्यात कोणालाही खूश करण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्तीला खूश नाही करु शकत. पण सिनेमा मात्र हे करु शकतो. तुम्ही काही ठराविक लोकांना खूश करण्याचा प्रयत्न करा. शेवटी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणालाच खूश करु शकला नाहीत, अगदी स्वतःलाही नाही.’

जेव्हा त्याचा एखादा सिनेमा प्रदर्शित होणार असतो तेव्हा तो सिनेमा चालेल की नाही याची थोडी कल्पना त्याला आलेली असते का? या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला की, ‘असं ठामपणे काही सांगता येत नाही. प्रत्येकवेळा आपण विचार करतो तसंच होतं असं नाही. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला चक दे इंडिया या सिनेमाचेच घ्या ना. मी हा सिनेमा केला कारण तो मला आवडला. यातली माझी व्यक्तिरेका मला खूप भावली. तसेच मी फॅनसारखाही एखादा सिनेमा करेन असं मला कधी वाटलं नव्हतं. मी या सिनेमाला हो बोललो कारण, मला ५० व्या वर्षी मी कुठे आहे ते मला स्वतःला आजमावून पाहायचे होते.’

दिग्दर्शकाचा अभिनेता हा शिक्का त्याच्यावर नेहमीच बसत आलेला आहे. यावरही त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. तो म्हणाला की, ‘अभिनेते सिनेमा स्विकारताना फार विचार करत नाही. मला असं वाटतं की कोणता सिनेमा करावा हे अभिनेत्याने न ठरवता, कसा सिनेमा बनवायचा हे दिग्दर्शकाने बघितले पाहिजे. प्रत्येकवेळा अभिनेत्याने एखादा वेगळ्या धाटणीचा सिनेमाच करावा हे काही जरुरी नाही. पण दिग्दर्शक आणि लेखकांना मात्र याचा विचार करावा लागतो आणि जसा दिग्दर्शक बोलतो त्याप्रमाणे कलाकाराने केले पाहिजे असे मला वाटते.’

‘शिवाय एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला त्यांना आवडेल असेच सिनेमे प्रत्येकवेळी मिळतातच असे नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर तुम्हाला ती मिळेल हा विश्वास मनात नेहमी ठेवा. पण तसे जर मिळाले नाही तर तुम्ही नुसते घरी बसू शकत नाही. तुम्ही तसं केलत तर माझ्यासारखा एखादा येईल आणि त्याचा सर्वात उत्तम असा दुसरा किंवा तिसरा सिनेमा करुनही मोकळा होईल.’