अभिनेता फरहान अख्तरसोबतच्या नात्यामुळे श्रद्धा कपूर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली होती. इतकंच काय, तर फरहानसोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं गेलं होतं. पण, या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि फरहान, श्रद्धा आपापल्या खासगी आयुष्यात व्यग्र झाले. काळ लोटला आणि आता पुन्हा एकदा श्रद्धा तिच्या कोणत्या आगामी चित्रपटामुळे नव्हे तर, नव्या आशिकीमुळे सर्वांचंच लक्ष वेधत आहे.

काही वेब पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार श्रद्धा सध्या सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा याला डेट करत आहे. मैत्रीपासून सुरु झालेल्या त्यांच्या या प्रवासाने प्रेमाचं वळण घेतलं असून, सध्यातरी त्या दोघांनीही आपलं नातं गुलदस्त्यातच ठेवण्याला प्राधान्य दिल्याचं कळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन आणि श्रद्धा एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत आहेत जी बाब अनेकांच्याच निदर्शनास आली आहे. रोहनने मात्र श्रद्धासोबतच्या नात्याच्या या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्टही केलं आहे. पण, आता खरंच या अफवा आहेत का हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

आपण श्रद्धाला जवळपास गेल्या नऊ वर्षांपासून ओळखत असलो तरीही ती फक्त आपली चांगली मैत्रीण आहे. त्यापलीकडे आमचं कोणतंही नातं नसून, आपण तिला डेट करत नसल्याचं रोहनने एका वृत्तपत्राशी संवाद साधताना स्पष्ट केलं. एका पार्टीमध्ये आपली श्रद्धाशी भेट झाली होती. आम्ही तेव्हापासूनच एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याचंही त्याने सांगितलं.

वाचा : आलियासोबतच्या लग्नाविषयी रणबीर म्हणतोय..

मुख्य म्हणजे श्रद्धाला डेट करत नसल्याचं म्हणत रोहनने आपल्या आयुष्यात त्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याचंही स्पष्ट केलं. ती श्रद्धा नसली तरीही आता नेमकी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठीच अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे. रोहनच्या आयुष्यात आलेल्या त्या व्यक्तीसोबतच्या त्याच्या नात्याची नुकतीच सुरुवात असल्याचंही तो म्हणाला. तेव्हा आता येत्या काही दिवसांमध्ये श्रद्धा आणि रोहनमध्ये नेमकं चाललंय तरी काय, यावरुन नक्कीच पडदा उठेल असं म्हणायला हरकत नाही.