अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन आता बराच काळ लोटला आहे. मात्र अद्यापही त्याच्या मृत्युमागील खरं कारण स्पष्ट झालेलं नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. यामध्येच लोकप्रिय अभिनेता आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांज यानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणारा दिलजीत बऱ्याच वेळा चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्यातच अलिकडे एका चाहत्याने सुशांत सिंह मृत्युप्रकरणी दिलजीतचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बोलत असताना, सुशांतने आत्महत्येचं पाऊल उचललं ही गोष्टचं पचनी पडत नाहीये, असं दिलजीत म्हणाला आहे.
“आयुष्यात मी सुशांतला केवळ दोन वेळाच भेटलो होतो. पण सुशांतनेआत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं ही गोष्टचं पचनी पडत नाही. समंजस मुलगा होता. बाकी मला खात्री आहे पोलीस त्यांचं काम करत आहेत. त्यामुळे आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. पण एक नक्की सत्य लवकरच समोर येईल”, असं उत्तर दिलजीतने दिलं.
दरम्यान, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर दिलजीतने यापूर्वीदेखील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या होत्या. त्याने ३० जून रोजी सुशांतसाठी एक पोस्ट लिहिली होती. इतकंच नाही तर सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा अशी मागणीही त्याने केली होती.