अभिनेता शाहरुख खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. वेगवेगळ्या राज्यांत जाऊन तो सिनेमाचे प्रमोशन करत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकताच तो अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक इम्तियाझ अलीसोबत बनारसला पोहोचला.
शाहरुख आणि अनुष्का या आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी बनारसमध्ये जबरदस्त गर्दी उसळली होती. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तिथे अभिनेता मनोज तिवारीही उपस्थित होता. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान चाहते फार मजा मस्ती करत होते. पण त्यांच्या आनंदात तेव्हा अधिक भर पडली जेव्हा शाहरुखने अनुष्कासाठी खास भोजपुरी गाणे गायले.

 PHOTOS: स्वित्झर्लंड टूरवर अशी मजा करतोय तैमुर

मनोज जेव्हा ‘लगावेलू लिपस्टिक’ गात होता तेव्हा शाहरुख त्याचं अनुकरण करत होता. हे गाणं गाताना त्याला अडचणी तर नक्कीच येत होत्या पण तरीही त्याने ते गाणं गायलं. ‘बॉलिवूड हंगामा डॉट कॉम’ने हा व्हिडिओ त्यांच्या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे. शाहरुख हे गाणं गात असताना तिथला प्रेक्षकही त्यांच्या सुरात सूर मिसळत होता. याशिवाय शाहरुख आणि अनुष्काने बनारसी पानही खाल्लं.

या सिनेमाचे प्रमोशन अगदी वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. सुरूवातीला सिनेमाचे मिनी ट्रेलर्स प्रदर्शित करण्यात आले. नंतर सुमारे तीन मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित केला. सिनेमाचे सारेच ट्रेलर हे उत्सुकता वाढवणारे होते. अनुष्काला तिची अंगठी मिळते का, अंगठी शोधण्याच्या या प्रयत्नात ती शाहरूखच्या प्रेमात कशी पडते या सर्व प्रश्नांची उत्तरं ४ ऑगस्टला चित्रपटगृहांत तुम्हाला मिळेलच. शाहरुख आणि अनुष्का या दोघांचा हा एकत्र तिसरा सिनेमा आहे. याआधी ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केले. हे दोघंही पहिल्यांदाच इम्तियाज अलीसोबत काम करत आहेत.