ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या शिस्तबद्ध स्वभावाविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. कोणतीही गोष्ट खटकल्यावर त्या थेट त्यावर भाष्य करतात. काही वेळा त्या नाराजीदेखील व्यक्त करतात. त्यातच प्रसारमाध्यमे किंवा छायाचित्रकार यांच्यासोबतच्या त्यांच्या वर्तणुकीविषयी सारेच जाणून आहेत. अनेकदा त्यांनी छायाचित्रकारांवर आगपाखड केली आहे. असाच प्रसंग पुन्हा एकदा घडला असून त्यांनी छायाचित्रकारांना खडे बोल सुनावले आहेत.
काही दिवसांपूर्वी जया बच्चन दाताच्या दवाखान्यात गेल्या होत्या. या दवाखान्याबाहेर त्या दिसल्यानंतर छायाचित्रकार त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, ही गोष्ट जया बच्चन यांना फारशी रुचली नाही. त्यांनी थेट छायाचित्रकारांना सवाल करत खडसावलं.
“काय चाललंय काय तुमचं?, तुम्ही इथे पण येता का?”, असा प्रश्न त्यांनी छायाचित्रकारांना विचारला. त्यावर छायाचित्रकारांनी जया बच्चन यांची माफी मागत, गाडी पाहून आम्ही इथे आलो होतो, असं स्पष्टीकरण दिलं.
वाचा : Drugs Case : दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरसह करण सजनानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
दरम्यान, सध्या जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘फिल्मी गॉसिप’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यापूर्वीदेखील जया बच्चन यांनी फोटोग्राफर्सवर संताप व्यक्त केला आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात त्यांच्या चिडण्याचं कारणदेखील त्यांनी सांगितलं होतं.