तृतीयपंथी समाज म्हटलं की नाकं मुरडणं हे ओघाने आलंच. पण, त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला आहे. तृतीयपंथीयांच्या व्यथा, समस्या चित्रपटांमधून मांडण्याचा प्रयत्न होतो आहे. असाच एक प्रयत्न शंतनु रोडे यांनी त्यांच्या आगामी ‘जयजयकार’ या चित्रपटामधून केला आहे. शंतनुच्या म्हणण्यानुसार प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सामाजिक, शारिरीक समस्या येतच असतात. त्यावर मात करुन जेव्हा तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या आयुष्याचा ‘जयजयकार’ होतो, या विचारावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटानिमित्त अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून त्यांनी चित्रपटातील त्यांची भूमिका, तृतीयपंथी समाजाबाबतचा दृष्टीकोन आणि मराठी चित्रपटांतील बदलते विषय, त्याला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद यावर प्रकाश टाकला.
 ‘जयजयकार’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्यातून वेगळा विचार आणि विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा विषय रंजक पद्धतीने मांडला आहे. चित्रपट कथेच्या स्वरुपात मांडताना त्याचा माहितीपट होणार नाही याची काळजी घेतली आहे. या चित्रपटात माझी भूमिका सैन्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याची आहे. त्याला सैन्यातील नोकरीची पाश्र्वभूमी आहे. युद्धातील भीषण सत्य त्याने पाहिलेले आहे. तो चक्रम आहे, एककल्ली, एकलकोंडा आहे. पण, त्याचवेळी तो सकारात्मक आहे, भाकड नाही. तो लोकं काय म्हणतील याचा विचार करत नाही, सामाजिक गोष्टींचे त्याला भान आहे आणि त्यामुळे तो या तृतीयपंथियांच्या समस्यांकडे ओढला जातो, असे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.  चित्रपटाच्या विषयाबाबत बोलताना त्यांनी  तृतीयपंथियांना समाजात मानाचं स्थान देणारा कायदा आता संमत झाला पण, शंतनुने या चित्रपटाची निर्मिती करण्यास दोन वर्षांंपूर्वी सुरवात केली होती. आता या विषयाचे महत्त्व लोकांना पटू लागलं आहे. पण, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमंलबजावणी होणे खरे गरजेचे आहे. या लोकांना मतदान ओळखपत्र, पासपोर्ट मिळाला पाहिजे. नोकरी आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
तृतियपंथियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही वाईट आणि चुकीचाच आहे, असे प्रभावळकर म्हणतात. या उपेक्षित लोकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. ट्रेनमध्ये जेव्हा हे भीक मागायला येतात तेव्हा लोकं त्यांना लगेच पैसे देऊन हाकलण्याचा प्रयत्न करतात. ते आक्रमक पद्धतीने भीक मागतात असा आपला आरोप असतो. पण, आता यांना योग्य मार्गी लावण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा, असे सांगताना प्रभावळकरांना ‘चौकट राजा’ची आठवण होते. खूप वर्षांपूर्वी मी ‘चौकट राजा’ नावाचा चित्रपट केला होता. त्यातील नायक अशाच प्रकारे सामाजिक उपेक्षांना बळी पडलेला होता. त्यात माझी भूमिका मतिमंद मुलाची होती. त्याला वैगुण्य होते, कमीपणा होता. या लोकांमध्ये वैगुण्य नाही आहे. हे लोक सक्षम आहेत. त्यांना आपल्या सहानभुतीची गरज नाही. आणि हा वर्ग संख्येनेही मोठा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होणे शक्य नाही. या चित्रपटामुळे लोकांची तृतीयपंथ्यांकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच बदलेल. असे चित्रपट मराठीत बनत आहेत यावरुनच आपल्याकडे विषयांची वैविध्यता आहे हे लक्षात येते, असेही ते म्हणतात.
आज आपल्याकडे मराठी चित्रपटांना विविध महोत्सवांमध्ये पारितोषिकांनी गौरवण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनीही चांगले, नवीन विषयाचे चित्रपट पाहण्याची सवय करुन घ्यायला हवी. पण, त्याचवेळी चित्रपट पाहण्यालायकही झाले पाहिजेत, असे प्रभावळकर आग्रहाने मांडतात. ते रंजक झाले पाहिजेत. कथा कितीही चांगली असली तरी त्याची मांडणी लोकांना आवडेल अशी झाली पाहिजे. ‘फँड्री’ सारख्या चित्रपटाने आज तीच किमया साधली आहे. आज जेव्हा मी तो चित्रपट पाहतो, तेव्हा मला आवडल्यास मी अजून वीसजणांना तो पहायला सांगतो. त्यातूनच चित्रपटाची प्रसिद्धी होते. चित्रपटाबाबत लोकांना उत्सूकता वाटली पाहिजे. नाहीतर पारितोषिकं मिळाली म्हणजे आपल्याला तो चित्रपट पहायला नको अशी लोकांची धारणा होते. ती होता कामा नये. चित्रपटाने लोकांच्या मनाची पकड घेतली पाहिजे. आज लोकांची पसंती बदलते आहे आणि काळानुरुप ती बदललीच पाहिजे. तरच वेगवेगळ्या विषयांच्या चित्रपटांची निर्मिती होईल, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.