बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्युप्रकरणी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आदित्य पांचोलीच्या निवासस्थानाची झडती घेतली. यावेळी आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली याच्या खोलीचीही झडती घेण्यात आली. जिया खानने ३ जून २०१३ रोजी तिच्या निवासस्थानी फास लावून आत्महत्या केली होती. मात्र, या आत्महत्येला आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली जबाबदार असल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. जिया आणि सुरज यांचे प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधातील वादातून जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. जियाच्या आईने केलेल्या मागणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. दरम्यान, काल सीबीआयच्या दोन पथकांनी पांचोली यांच्या निवासस्थानाची कसून तपासणी केली. मात्र, या तपासातील माहिती उघड करण्यास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. मध्यंतरी जियाच्या आईने आपल्या कुटुंबियांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करीत सूरजचे वडील अभिनेता आदित्य पांचोली याने तिच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jiah khan death cbi searches residence of aditya pancholi