करोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या वाढतच चालला आहे. जगभरातील वैद्यकिय तज्ज्ञ या प्राणघातक विषाणूला रोखण्यासाठी काही ठोस उपाय शोधत आहेत. त्यांच्या या संशोधनाला अद्याप फारस मोठं यश आलेलं नाही. मात्र करोना सदृश्य लक्षणांपासून दूर राहण्यासाठी एक उपाय लेखिका जे. के. रोलिंग हिने सांगितला आहे.

काय आहे तो उपाय?

हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरी आणि चित्रपट मालिकेची लेखिका जे. के. रोलिंग हिने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. “हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमधील डॉक्टर करोना सदृश्य लक्षणांपासून दूर राहण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा व्यायाम करण्याचा सल्ला देत आहेत. मला देखील काही दिवसांपूर्वी अशी लक्षणं जाणवत होती. मात्र हा व्यायाम केल्यामुळे त्या लक्षणांमधून मी पूर्णपणे बरी झाले.” अशा आशयाची कॉमेंट जे. के. रोलिंग हिने या ट्विटवर केली आहे.

तिने अशीच काहीशी पोस्ट इन्स्टाग्रानवर देखील पोस्ट केली होती. या पोस्टला बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने रिपोस्ट केलं आहे.
जगभरातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. अगदी सर्दी किंवा खोकला झाला तरी मला करोना तर झाला नाही ना? असे विचार त्यांच्या मनात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रोलिंगने केलेले हे ट्विट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.