जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या सिनेमाला २० वर्षं पूर्ण झाली आहेत. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने त्यावेळी सर्वाधिक कमाई तर केली त्याचबरोबर या सिनेमाने अनेक इतिहाससुद्धा रचले. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मनं जिंकली. सिनेमातील गाणी तर आजसुद्धा लोकांच्या ओठांवर आहेत. ‘संदेसे आते हैं…’ या गाण्याला प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शवली होती. देशभक्तीपर सिनेमांमधील एक उल्लेखनीय असा सिनेमा म्हणून याकडे पाहिले जाते.
‘बॉर्डर’ सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जे. पी. दत्ता आणि ‘बॉर्डर’च्या संपूर्ण टीमने जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी पूजा भट्ट, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी यांच्यासोबतच जावेद अख्तर, अनू मल्लिक, अभिषेक बच्चनसुद्धा या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होते. या सेलिब्रेशनची संपूर्ण तयारी दत्ता यांची पत्नी बिंदिया गोस्वामी यांनी केली होती.
यावेळी सिनेमाशी संबंधित चर्चासुद्धा या कलाकारांमध्ये झाली. सुनील शेट्टीने त्यावेळचा एक किस्सासुद्धा सांगितला, ‘सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी एक सैनिक आहे असंच मला वाटत होतं.’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा सुनील शेट्टी कारगिलला गेला होता तेव्हा सैनिकांनी त्यांचे अभिनंदन केल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
त्यावेळचा आणखी एक किस्सा सुनील शेट्टीने सांगितला. सिनेमात मेजरला आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच युद्धाला जावं लागतं आणि त्यांची पत्नी त्यामुळे दु:खी होते. युद्धाला गेल्यानंतर त्यांची पत्नी गरोदर असल्याचं त्यांना समजतं. रिअल लाईफमध्येसुद्धा या सिनेमाची शूटिंग करत असताना सुनील शेट्टीची पत्नी मान्या गरोदर असल्याचं त्याने सांगितलं. अथियाचा छोटा भाऊ आहानचा त्यावेळी जन्म होणार होता.
जे. पी. दत्तांनीसुद्धा यावेळी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते दिल्लीतील उपहार सिनेमागृहात गेले असता चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी कशाप्रकारे क्रेझ होती हे त्यांनी सांगितले. सिनेमात जॅकी श्रॉफने घातलेला एक जॅकेट दत्ता यांचा भाऊ दीपक दत्ता यांचा ‘जी सूट’ असल्याचंही त्यांनी सांगितलं.