सुपरस्टार सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चर्चा सुरु असतानाच या चित्रपटातील सहकलाकारही बरेच चर्चेत आले आहेत. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट एका अर्थी मल्टीस्टारर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. या चित्रपटातील चिनी अभिनेत्री झू झू सोबतच बालकलाकार माटिन रे तंगूसुद्धा सर्वांचं लक्ष वेधत आहे.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमामध्ये माटिनने प्रसारमाध्यमांशी दिलखुलास संवाद साधला. त्यावेळीही त्याने अनेकांचीच मनं जिंकली. अवघ्या पाच वर्षे वयाच्या या बालकलाकाराने ‘ट्युबलाइट’च्या संपूर्ण टीमसोबतच भाईजान सलमानलाही वेड लावलं आहे. मुळचा अरुणाचल प्रदेशमधील इटानगर भागातील माटिन या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या या मायानगरीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. ‘फिल्मी फोल्क्स’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार माटिन हा कॅप्टन अनुपम तंगू आणि मोनिषा करबाक यांचा सर्वात लहान मुलगा आहे. त्याचे वडील अरुणाचल प्रदेशच्या उपमुखयमंत्र्यांचे विषेशाधिकारी म्हणून काम पाहतात. मुख्य महणजे माटिनचे बाबाही सलमानचे चाहते आहेत.

वाचा : आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड 

माटिनचे फोटो आणि काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचच लक्ष वेधत आहेत. त्यातच प्रसारमाध्यमांच्या प्रशांना सामोरं जाण्याचा त्याचा अंदाजही खास आहे असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, सलमानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटात १९६० च्या दशकाचा काळ साकारण्यात आला आहे. त्यासोबतच लडाख, हिमाचल प्रदेश अशा सुंदर ठिकाणी चित्रपटाचं चित्रीकरण केलं गेलं असल्यामुळे प्रेक्षकांना सुरेखं ठिकाणंही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.